आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र आणि गुजरातचा सीमावर्ती भाग आदिवासी बहुल आहे. मात्र, दोन्ही ठिकाणच्या गावांच्या चेहऱ्यात बरेच अंतर आहे. गुजरातमधील गावे बऱ्यापैकी विकसित आहेत. महाराष्ट्रातील गांवे त्यामानाने बरीच भकास दिसतात. सध्या गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची मागणी महाराष्ट्रातील ५५ गावांमधून हाेत आहे. त्या अनुषंगाने शेती सिंचन, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, रोजगार, आरोग्य, रस्ते अशा सर्व आघाड्यांवर दाेन्ही राज्यांतील सीमावर्ती भागात असणाऱ्या फरकाची तफावत समाेर आणणारी बाेलकी छायाचित्रे...
सुरगाणा तालुक्यातील रगतविहीर या गावातील पाण्याअभावी रुक्ष शेतजमीन एकीकडे, तर दुसरीकडे तेथून जेमतेम २०० मीटरवर वसलेल्या गुजरातमधील निरपण गावातील हिरवेगार समृद्ध शिवार. असेच दृश्य सीमावर्ती भागातील गावांमध्ये प्रामुख्याने दिसून येतेे.
विकास निधी वाटपात तफावत गुजरात आणि महाराष्ट्रातील गावांना विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीमध्ये मोठी तफावत आहे. दाेन्ही ठिकाणच्या विकासात हाच मुख्य फरक आहे. गुजरातच्या निरपण या जेमतेम ८०० लोकवस्तीच्या गावात आठ महिन्यांत रस्ते, गटार, बोअर यासाठी तब्बल ६० लाखांचा निधी उपलब्ध झाल्याचे सरपंच काशीराम चौधरी यांनी सांगितले. तर तेथून अवघ्या २०० मीटर अंतरावरील महाराष्ट्रातल्या रगतविहीर या २००० लोकवस्तीच्या ग्रुप ग्रामपंचायतीला वर्षाकाठी जेमतेम १५ लाखांचा निधी मिळतो. कामांना मंजुरी आणि अन्य बाबींतही गुजरात खूपच कार्यक्षम असल्याचे योगेश गावित या स्थानिक युवकाने सांगितले.
राहणीमान : गुजरातमध्ये आर्थिक संपन्नतेचे प्रतिबिंब महाराष्ट्रातील गावांमध्ये अर्थार्जनाचे स्त्राेत कमी असल्याने इथे घरांमध्ये सामान्यत: अगदीच गरजेपुरत्या वस्तू आढळतात. अनेकांच्या स्वयंपाकघरात अजूनही मातीच्या चुलीच आहेत. गुजरातमधील घरांमध्ये मात्र सर्वसाधारणपणे स्वंयंपाकाचा गॅस, अन्य संसाराेपयाेगी वस्तूंची मुबलकता दिसते. साधारणपणे घरांचे बाह्यस्वरूप देखील वेगवेगळे आहे. महाराष्ट्रातील घरे झापाची वा कच्ची आहेत. तर गुजरातमधील घरे पक्की व सुविधायुक्त आहेत.
सासर-माहेर फरक सुरगाणा तालुक्यातील धामणपूरचे माहेर आणि गुजरातच्या मोरदहाडचे सासर असलेल्या भारती प्रकाश पाडवी यांनी दोन्ही ठिकाणांतला फरक स्पष्ट केला. धामणपूर येथे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी भारती यांना सुरगाणा येथे जावे लागे. विवाहानंतर त्या मोरदहाड येथे आल्या आणि त्यांना दोन्ही ठिकाणांतील फरक जवळून अनुभवास येऊ लागल्याचे त्या सांगतात. इथे पाणी मुबलक आहे. घराच्या अंगणातच हातपंप आहे. वीज कायम असते. मोबाइलला रेंज आहे. रस्ते चांगले आहेत. घरात स्वयंपाकासाठी गॅस आहे. या उलट स्थिती सुरगाणा तालुक्यात आहे. तेथे या सुविधांची कमतरता जाणवते.
गुजरात माॅडेल : जागाेजागीच्या सिमेंट बंधाऱ्यातून पाणी शिवारापर्यंत दोन्ही ठिकाणी शेती हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन. मात्र, महाराष्ट्रातील गांवे त्यासाठी केवळ पावसाच्या भरवशावर असतात. परिणामी, इथे वर्षाकाठी मोठ्या मुश्किलीने एक पीक घेतले जाते. त्याउलट गुजरातमध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या शिवारात थेट पाईपलाईनचे पाणी खेळताना दिसते. पाईपलाईन नेणे शक्य नसेल तिथे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र विहीर किंवा बोअरची व्यवस्था ‘सरकार’ने करून दिली आहे. त्यामुळे तिथे वर्षाकाठी दोन ते तीन पिके घेणे शक्य होते. भाजीपाल्यासोबत अन्य नगदी पिके शेतात डोलताना दिसतात. त्यामुळे सरासरी वार्षिक उत्पन्नात अडीच ते तीन पट फरक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पिण्याच्या पाण्याबाबतही असाच फरक आहे. गुजरातच्या गावांत घरोघर नळ पोहचलेत. किमान अंगणात स्वतंत्र हातपंप तरी आहेत. महाराष्ट्रातील रहिवाशांना मात्र वर्षाकाठी सहा ते आठ महिने पाणी भरण्यासाठी एक ते दीड किलाेमीटर पायपीट करावी लागते.
सुरगाणा तालुक्यातील रगतविहीर या गावातील पाण्याअभावी रुक्ष शेतजमीन एकीकडे, तर दुसरीकडे तेथून जेमतेम २०० मीटरवर वसलेल्या गुजरातमधील निरपण गावातील हिरवेगार समृद्ध शिवार. असेच दृश्य सीमावर्ती भागातील गावांमध्ये प्रामुख्याने दिसून येतेे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.