आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षाचा आघात:रिक्षावर अचानक कोसळला गुलमोहर वृक्ष; चालकासह महिला प्रवासी ठार

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाचे आगमन होताच शहरात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना सुरू झाल्या असून शनिवारी रिक्षावर गुलमोहराचे झाड कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा बळी गेला आहे. नाशिक-त्र्यंबक या मुख्य रस्त्यावरील एबीबी सिग्नल व आयटीआय सिग्नलच्या मध्ये असलेल्या कुक्कुटपालन केंद्रासमोर रिक्षावर अचानक झाड कोसळल्याने रिक्षाचालकासह प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. ११) सकाळी ९.१५ वाजता हा अपघात घडला. पोपट कृष्णा सोनवणे असे रिक्षाचालकाचे तर शैला शांतिलाल पटणी असे महिलेचे नाव आहे.

रिक्षाचालक सोनवणे हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एमएच १५ एफयू ०३६०) ने नाशिककडून सातपूरकडे जात असताना कुक्कटपालन केंद्रासमोर रिक्षावर अचानक गुलमोहरचे मोठे झाड कोसळले. या घटनेत दोघेही जागीच ठार झाले असून रिक्षाचाही चेंदामेंदा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत रिक्षाचालक आणि महिला प्रवासी रिक्षातच अडकून होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत रिक्षावर कोसळलेले झाड दूर केले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दररोज त्याच रिक्षाने करायच्या प्रवास : या अपघातात मयत झालेल्या शैला पटणी या गंजमाळ येथील सहवासनगर परिसरात वास्तव्यास होत्या. नोकरीनिमित्त त्यांना अंबड औद्योगिक वसाहतीत जावे लागत होते. त्यामुळे त्यांनी महिन्याप्रमाणे दररोजसाठी रिक्षा फिक्स केलेली होती.

सातपूर विभागातील १७२ झाडे काढली : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातपूर विभागात उद्यान विभागाच्या वतीने १७२ सुकलेली झाडे काढण्यात आली असून अनेक झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. तक्रारी असलेले धोकेदायक झाडे काढण्याचे काम सुरू असल्याचे मनपाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

प्रशासनाचा हलगर्जीपणा
मनपाच्या वतीने पावसाळ्यापूर्वीची कामे वेळेत पूर्ण न केल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह प्रवाशांनी केला आहे. या घटनेनंतर तरी मनपा प्रशासनाने जागृत होऊन मान्सूनपूर्व कामे पूर्ण करावीत.
- रवींद्र देवरे, सामाजिक कार्यकर्ते

शहरात गुलमोहराची ५७०० झाडे
नाशिक शहरात एकूण ४६ लाख वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत. त्यात गुलमाेहरची सुमारे ५७०० झाडे असून ही सर्व झाडांची जुन्या काळातच लागवड करण्यात आली आहे. नव्याने मात्र आता गुलमाेहरची लागवड केली जात नसल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले.

वृक्ष प्राधिकरणाकडे अनेक प्रस्ताव पडून
धोकादायक वृक्ष काढण्याबाबतची परवानगी देण्यासाठी नाशिक महापालिकेत वृक्ष प्राधिकरण समिती कार्यरत आहे. मात्र १५ मार्चपासून लोकप्रतिनिधींची मुदत संपल्याने या समितीचे कामकाजही बंद आहे. त्यामुळे या समितीकडे शहरातील विविध भागांतील अनेक धोकादायक झाडांचे प्रस्ताव पडून आहेत.

पावसामुळे मोठे वृक्षही कोसळले
शहर परिसरात झालेल्या पावसामुळे दोन दिवसांत विविध भागांमध्ये १२ झाडे उन्मळून पडल्याची नोंद अग्निशामक विभागाकडे झाली आहे. यात एबीबी सर्कल, पारिजातनगर व संदीप हॉटेलच्या परिसरातील मोठ्या वृक्षांचा समावेश आहे.

धोकादायक वृक्ष काढण्याचे काम सुरूच
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक वृक्ष काढण्याचे काम सुरू आहे. गुलमोहर वृक्ष धोकादायक असल्याचे दिसून येत नाही, मात्र ते मुळातच ठिसूळ असल्याने अचानक कोसळतात. त्यामुळे पालिकेच्या वतीने गुलमोहर वृक्षांची लागवड बंद केली आहे. सध्या असलेले सर्व वृक्ष जुने आहेत. - विजय मुंडे, उपायुक्त, मनपा

पावसात वृक्षाखाली उभे राहणे टाळा
शहरात विविध भागांमध्ये गॅस पाइपलाइनमुळे रस्ते खोदून ठेवलले आहेत. त्यातच नव्याने तयार केलेले रस्ते पुन्हा-पुन्हा वेगवेगळ्या कारणांसाठी खोदले जात आहेत. हे खोदकाम करताना मोठ्या प्रमाणात झाडांची मुळे तुटत असल्याने पाऊस पडल्यानंतर मातीत ओलावा येऊन मुळांची पकड ढिली पडते. परिणामी फक्त गुलमोहरच नव्हे तर रस्त्याच्या कडेची व कललेली झाडे कोणत्याही क्षणी उन्मळून पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी पाऊस अथवा वादळवारा सुरू असताना झाडांखाली उभे राहू नये.
- शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमी

बातम्या आणखी आहेत...