आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपिट:उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा तडाखा, पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांची पळापळ , नाशकात 1170 हेक्टरवरील द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा, पालेभाज्यांना फटका

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्री तालुक्यातील बोपखेल, उमऱ्यामाळ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. - Divya Marathi
साक्री तालुक्यातील बोपखेल, उमऱ्यामाळ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.

जिल्ह्यात भरउन्हाळ्यात सलग तीन दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट सुरू असल्याने द्राक्ष, कांदा या प्रमुख पिकांसह गहू, हरभरा, पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी रात्रीपर्यंत ११७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. नाशिक शहरात बुधवारी सकाळपर्यंत १० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढून तापमान ३७ अंशांपर्यंत गेले होते. मात्र वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. गारपिटीमुळे कांदा पीक पाण्यात भिजले असून कापलेल्या कांद्यामध्ये पाणी गेल्याने तो सडण्याची शक्यता आहे. दिंडोरी तालुक्यात जोरदार वादळामुळे समाधान पठारे यांची काढणीला आलेली द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. मंगळवारी सायंकाळी सिन्नर तालुक्यातील मोह, नायगाव, जायगाव, जाखोरी, चाटोरी, ब्राह्मणवाडे, मोहदरी, खंडागळी या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपीट झाली. तसेच निफाड, येवला, चांदवड, वाहेगाव, निफाड रुई, धानोरे, लासलगाव, रानवड, खडक माळेगाव, पिंपळस रामाचे, सिद्ध पिंप्री, वनसगाव या ठिकाणी बुधवारी पहाटेपासून पाऊस सुरू झाला होता. काही ठिकाणी आंबा बागेचा मोहर गळून पडला आहे. राज्यात गहू काढण्याची तयारी सुरू आहे.
म्हणून अवकाळी पाऊस : अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे तसेच कोकणापासून या वाऱ्यांपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र आणि अरबी समुद्राच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रासह गुजरातमध्ये अवकाळी पाऊस होत आहे. विदर्भात जोरदार वारे, तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबारसह अहमदनगर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यांसह गारपीट आणि ठराविक ठिकाणी धुवाधार पाऊस होत आहे.
विभागात ८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित : नाशिक विभागात बुधवारपर्यंत ७ हजार ९०० हेक्टर पिकांचे क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल होता, यामध्ये पुन्हा वाढ होणार आहे.

मराठवाड्यात हलका पाऊस, विदर्भात जाेरदार वारे
धुळे, जळगाव जिल्ह्यात कांदा, गहू, बाजरी, मका या पिकांचे नुकसान झाले. केळी बागांचे अल्प नुकसान झाले. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होऊन हलका पाऊस झाला. तर परभणी, बीड, उस्मानाबाद या भागात वारे वेगाने वाहत होते. विदर्भात वातावरण स्वच्छ झाले असले तरी गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहत होते.

उद्यापर्यंत पावसाचा अंदाज
राज्यात ११ मार्चपर्यंत ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार अाहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात तर मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. कोकणात रायगड, सिंधुदुर्ग तर विदर्भात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांत वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...