आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्त वाहतुकीकडे दुर्लक्ष:धन्यता केवळ विनाहेल्मेट अन दंड वसूलीत; शहर मात्र अडकते अनधिकृत पार्किंग, वाहतूक कोंडीत

जहीर शेख | नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट हाेत असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत.‍ बेशिस्त वाहतूक आणि अनधिकृत पार्किंगमुळे चौकांसह सिग्नलवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. बंद असलेल्या सिग्नलवर वाहतूक पाेलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी येत नसले तरी काही सिग्नलवर मात्र चार-पाच वाहतूक पोलिस उभे असतात. असे असले तरी केवळ हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यातच ते धन्यता मानत असल्याने वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आले. त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत....

सध्या ठिकठिकाणी वाहतूक पोलिस केवळ हेल्मेटसह इतर कारवाईत गुंतले असल्याने बेशिस्त वाहतूक व अनधिकृत पार्किंगमुळे प्रमुख रस्त्यांचा श्वास कोंडला आहे. शहरातील शालिमार, मेनरोड, सीबीएससह मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर तर नित्याची कोंडी असते. याशिवाय, महामार्गावरील पाथर्डी फाटा, इंदिरानगर बोगदा, मुंबईनाका सर्कल, द्वारका सर्कल ही ठिकाणी वाहतूक कोंडीचीच आहेत. तसेच, अशोका मार्गातून बाहेर पडताना फेम सिग्नल, उपनगरनाका आणि बिटको सिग्नलवर अपघात वाढले आहेत. त्यामुळे आकाराने लहान शहर व शहराभोवतीचे रिंगरोड असतानाही शहरातील वाहतूक कोंडीची समस्या डोकेदुखी ठरत आहे. यात प्रामुख्याने वाहतूक पोलिस शाखेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचीच गंभीर बाब डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आली आहे.

व काही ठिकाणी पाच कर्मचारी तर काही सिग्नलवरील कर्मचारीच गायब : अनेक सिग्नलवर वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे पाहणीत समोर आले. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या रेडक्रॉस सिग्रल, गंजमाळ चौक, वडाळारोडवरील नागजी चौक, सिडकोतील त्रिमूर्ती चौक, त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नल, सिबल हॉटेल सिग्नल, कॉलेजरोडवरील कुलकर्णी चौक, शरणपूररोडवरील कॅनडा कॉर्नर सिग्नल, मखमलाबादरोडवरील ड्रीम कॅसल सिग्नल, पेठरोडवरील पेठनाका, शरद पवार मार्केटजवळील सिग्नल, दिंडोरीरोडवरील तारवालानगर सिग्नल, रिलायन्स पेट्रोलपंप सिग्नल या ठिकाणची सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे.

मात्र, या ठिकाणी पोलिस कर्मचारी रहात नसल्याने अनेक वाहनचालक सिग्नलचे पालन करीत नसल्याचे दिसून आले. दुसरीकडे मुंबईनाका, द्वारका, मायको सर्कल, एबीबी सर्कलसह सीबीएस सिग्नलवर चार ते पाच वाहतूक पोलिस उपस्थित रहात दंड वसुलीत व्यस्त रहात असल्याचे चित्र आहे.

वाहतूक शिस्तीकडे दुर्लक्ष, दंडात्मक कारवाईकडे लक्ष
त्र्यंबकरोडवरील सावरकर जलतरण तलाव, शरणपूर पोलिस चौकी, दिंडोरीरोडवरील तारवाला सिग्नल, सीबीएस सिग्नल, द्वारका सर्कल, उपनगरनाका या ठिकाणी शहर वाहतूक पोलिस शाखेचे एक-दोन नव्हे तर पाच ते सहा वाहतूक पोलिस सिग्नल सोडून एका मार्गावर काही अंतरावर थांबलेले असतात. सिंगल तोडून वाहनचालक निघून जाणे, झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, ज्या दिशेने थांबलेले असतील त्या दिशेने येणाऱ्या विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट, अवजड वाहनांना रोखून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

गंजमाळ, वडाळानाका सिग्नलचा ‘पॉइंट’ का नको?
मुख्य वाहतूक कोंडीचे ठिकाण ओळखले जाणारे द्वारका, मुंबईनाका भागासह टिळकवाडी सिग्नल, कॅनडा कॉर्नर सिग्नल, जुना गंगापूरनाका सिग्नल, आयटीआय सिग्नल, एबीबी सिग्नल, सिटी सेंटर मॉल सिग्नलवर नियुक्तीसाठी वाहतूक पोलिसांमध्ये स्पर्धा लागते तर गंजमाळ व वडाळारोड सिग्नल ‘नको रे बाबा’ असे म्हटले जात असल्याचे चित्र आहे. शहरातील काही पॉइंट हे वाहतूक पोलिसांसाठी अर्थ नियोजनासाठी सोयीचे मानले जातात. असे पॉइंट मिळावे यासाठी वाहतूक पोलिस आग्रही असतात. त्यासाठी वेगळेच अर्थकारणही वाहतूक शाखेत चालते, अशीही चर्चा आहे.

‘या’ भागातील रस्त्यावर बिनदिक्कत केली जातेय वाहन पार्किंग
मुंबईनाका पोलिस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वाहने पार्किंग केली जात आहे. गडकरी चौक, जिल्हा परिषद ते चर्चपर्यंत, कॅनडा कॉर्नर सिग्नलच्या दोन्ही बाजूला, सारडा सर्कल भागासह द्वारका भागातील तिवंधा चौकापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याचे चित्र आहे.

चार पोलिस; तरीही स्मार्ट रोडवर काेंडी
स्मार्ट रोडवरील त्र्यंबकनाका, सीबीएस सिग्नल, मेहेर सिग्नल या तीनही ठिकाणी सकाळ-सायंकाळ वाहतूक कोंडी हाेते. बहुतांशी सिग्नलचे पालन होत नाही. मेहेर सिग्नलवर तर चुकीच्या दिशेने वाहने चालविली जातात, तरीही वाहतूक पोलिस कोणतीही कारवाई करीत नाही. मेहेर, सीबीएस सिग्नलजवळच अनधिकृतरित्या रिक्षा थांबे तयार झाले असून त्यामुळे वाहतूक कोंडी होऊनही त्या रिक्षाचालकांवर कोणतीही कारवाई होत नाही.

अनेक सिग्नलवर वाहतूक कोंडी...
सिग्नल यंत्रणेवर थांबवण्याऐवजी पोलिस भलतीकडेच थांबतात. यामुळे अनेक लोक सिग्नलवर न थांबता तसेच निघून जातात. परिणामी, अनेकवेळा सिग्नलवर वाहतूक कोंडी होते.- योगेश चव्हाण, नागरिक

पाेलिस कर्मचाऱ्यांचे करावे नियाेजन
गंजमाळ, वडाळानाका भागासह काही सिग्नलवर पोलिसच नसतात. तर मुंबईनाका, सिटी सेंटर माॅल व सीबीएस येथे चार ते पाच पोलिस असतात. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांचे नियोजन का केले जात नाही? - हेमंत जाधव, वाहनचालक

बातम्या आणखी आहेत...