आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास आठवलेंचा दावा:म्हणाले - देशातील मुसलमानही बाहेरून आले नाहीत, तेही आधी हिंदू आणि तत्पूर्वी बौद्ध होते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या देशात असलेले ब्राम्हण, क्षत्रिय, मुस्लीम आणि शुद्र हे सगळेच अडीच हजार वर्षांपूर्वी बौद्ध होते. नंतर देशात हिंदू धर्म येऊन लोक हिंदू झाले. हिंदू-मुस्लिम असा तेढ निर्माण करू नका. देशातील मुसलमानही बाहेरून आलेले नाहीत. तेही आधी हिंदू आणि तत्पूर्वी बौद्ध होते, असा दावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देवळाली कॅम्प येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

सर्वांत आधी जगात बौद्ध धर्म होता त्यानंतर हिंदू आला, त्यानंतर मुस्लीम असं करत सर्व धर्म तयार झाले. बौद्ध हा सर्वांत जुना धर्म आहे. मुस्लीम धर्म हा सुद्धा हिंदू धर्मापासून तयार झाला आहे असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

भोंगे वादावरून राज ठाकरेंवर टीका

राज ठाकरेंची भूमिका मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास'ला छेद देणारी आहे. वाद लावण्याचा प्रयत्न हा काही लोकांचा आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये वाद होणे हे देशासाठी फार मोठे नुकसान आहे, असे म्हणत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भोंगे वादावरून टीका केली.

राज ठाकरेंची भूमिका असंवैधानिक
आठवले म्हणाले की, 'राज ठाकरेंनी हनुमान चालीसेचे पठण मंदिरात करण्यात हरकत नाही. मशिदीवरचे भोंगे काढा अन्यथा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू, ही गुंडागर्दी योग्य नाही. माझा पक्ष हा बाबासाहेबांच्या संविधानाचे संरक्षण करणारा आहे. त्यांची भूमिका असंवैधानिक पद्धतीची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही भोंगे उतरविण्याची भूमिका घेतली नाही. भगवा रंग गौतम बुद्धांचा आहे. बुद्धाच्या काळातही बौद्ध भिक्खूंच्या वस्त्रांचा रंगसुद्धा भगवाच होता म्हणून भगवा रंग शांततेचा आहे. राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले असल्याने वाद करण्यापेक्षा वाद मिटविण्याचे काम करावे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद नको.

यापूर्वीही रामदास आठवलेंनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला होता. राज ठाकरे हे शिवसेनेतुन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या झेंड्यामध्ये भगवा, हिरवा, निळा पांढरा रंग होता. मग त्यांनी मनसेच्या झेंड्यातील सगळे रंग काढले. तुम्हाला रंग बदलायची सवय आहे का? आता फक्त भगवा रंग शिल्लक आहे. पण भगवा हा शांतीचे प्रतीक आहे. भगवा आग विझविण्याचे काम करतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी आग लावायचा प्रयत्न करू नये, असे आठवले म्हणाले होते. तसेच भाजपा-मनसे युतीची शक्यता रामदास आठवले यांनी फेटाळली. राज ठाकरे यांच्याबरोबर युती करणे हे भाजपाला परवडणारे नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...