आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टगारपिटीने स्वप्नांची राखरांगोळी:द्राक्ष, कांद्यासह सर्वच पिकांचे मातेरे...डोक्यावर पुन्हा कर्जाचा डोंगर; शेतकऱ्यांची व्यथा

सचिन वाघ | नाशिकरोड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन पोरांची स्वप्नं साकार करण्यासाठी शेतात राब राब राबतोय... एकाला देशसेवा करायची म्हणून तो होस्टेलमध्ये राहून एनडीएचा अभ्यास करतोय.. त्याला वर्षाला दोन लाख रुपये लागतात... त्याला काहीही कमी पडू नये म्हणून आम्ही दोघे नवरा-बायको शेतीत घाम गाळतोय.. कांदा काढायला आल्यानं दोन दिवसांत सुरुवात करायची होती.. पण नशिबात वेगळंच लिहिलेलं होतं.. गारपिटीने घात केला व अडीच एकर कांदा खराब झाला... मजुरी जाईल म्हणून आम्ही दोघंच राबायचो... पैसे जोडून व काही उधारी करून कांदा वाढवला होता. आता पुन्हा बोकांडी कर्ज बसल्याने घेतलेले पैसे कसे चुकते करायचे... ओल्या डोळ्यांनी कांद्याकडे पहात इगतपुरीच्या शेणित येथील आशा तानाजी तुपे बोलत होत्या...

गारपिटीने रविवारी शेणीतसह वंजारवाडी, साकूर फाटा या ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी उद‌्ध्वस्त झाले असून त्यांच्या स्वप्नांचीही राखरांगोळी झाली आहे.

आम्ही थोडे पुढे गेलो. परिसरात बहुतेक ठिकाणी शेतातील पिके उद्ध्वस्त झाल्याचे दिसत हाेते. रविवारी रात्री झालेल्या गारपिटीनंतर गारांचा खच तसाच पडून होता. शेणीत गावाच्या बाहेरच सिन्नर-घोटी मार्गावर लातूरच्या परमेश्वर पुरी या युवकाने शेतीमध्ये प्रगती करू म्हणून शरद छबू जाधव यांच्याकडून एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली होती. त्यामध्ये रोपवाटिका उभारली. कोबी आणि फ्लॉवरची लागवड केली. सुमारे सव्वादोन लाख रोपे विक्रीसाठी तयार झाली होती, परंतु गारपिटीत संपूर्ण १३ लाख रुपयांचे नेटहाऊसच कोलमडून पडले. त्यामध्ये प्रति १ रुपया २० पैशांनी विक्री होणारे रोप, अशा दोन लाख कोबी व फ्लॉवर रोपांचे नुकसान झाले. व्यवसायापेक्षा नोकरी केली असती तर ते बरे झाले असते, असे व्याकूळ चेहऱ्याने परमेश्वर व्यथा मांडत होता.

त्यांच्यासारखीच परिस्थिती साठी ओलांडलेल्या पार्वताबाई गणपत शिरसाठ या आजींची.. नातवंडांचे भविष्य चांगले घडावे म्हणून त्या या वयातही कोबीच्या शेतात राबतात. परंतु, गारपिटीत कोबीचा कंदही राहिला नाही.

गारांमुळे टरबूज पिकाच्या वेलींचेही तुकडे

परमेश्वर पुरीच्या रोपवाटिकेपासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर तानाजी लहानू जाधव आता भविष्यात फक्त रोगर प्यायचे राहिल्याचे सांगत आपला निसर्गावरचा संताप काढत होते. त्यांनी दीड महिन्यापूर्वी २० गुंठ्यामध्ये शुगरकिंग जातीचे टरबूज लावले. ते अडीच ते तीन किलोचे झाले होते. पण गारपिटीच्या तडाख्यात कलिंगडाची पानेच नाही तर वेलींचेसुद्धा तुकडे झाले. टरबुजाचे आणि वाल शेंगांचे पैसे झाल्यावर १० गायींचा गोठा बांधायचे स्वप्न अधुरे राहिले. पोरांच्या कपड्यांकडे दुर्लक्ष करीत टरबूज आणि वाल शेंगांसाठी पैसे लावले. आता पोरांना कपडे नाही अन‌् गोठाही नाही, असे रडक्या चेहऱ्याने जाधव सांगत होते.