आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांराबळ:अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा, शहरात वृक्ष कोसळले, वीज खंडित

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तारांबळ सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह अचानक पाऊस

गत तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धो धो पडणाऱ्या अवकाळी पावसाने शुक्रवारी शहरातही हजेरी लावली. सायंकाळी ढग दाटून आले. काळोख पडला अन् सहाच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह शहर व परिसरामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे आलेल्या मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांसह साऱ्यांचीच तारांबळ उडाली. वेगाने वारा सुटल्याने अग्निशमन दलाला हाय अलर्टही देण्यात आला. या पावसामुळे सिडकोत वृक्ष कारवर कोसळल्याने कारमधील चौघे किरकोळ जखमी झाले.

मार्च महिन्यात उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार नेहमीप्रमाणे शुक्रवारीही सकाळपासून प्रखर ऊन पडले होते. पण, सायंकाळी पाचच्या सुमारास ढग दाटून आले अन् शहरासह परिसरात काळोख पसरला. पावसाचे वातावरण निर्माण झाले अन् पुढील पाऊण तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालये अन् कंपन्यांची सुटी होण्याच्या वेळेतच पाऊस आल्याने, शिवाय सोबत छत्री वा रेनकोट नसल्याने घरी कसे जायचे असा प्रश्न या चाकरमान्यांना पडला. अनेकांनी ठरवून ठेवलेली कामे असल्याने काही काळ वाट पाहून इतक्यात पाऊस उघडणार नसल्याने अखेर पावसातच आपल्या दुचाकीवरून ओले होत घराकडे प्रयाण केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

कारवर वृक्ष कोसळला, चार जखमी
वादळी वाऱ्याने सिडको परिसरात कारवर वृक्ष कोसळल्याने कारमध्ये अडकलेल्या चौघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वृक्ष बाजूला करत बाहेर काढले. चाैघेजण यात किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत वृत्त असे की सिडको, पाथर्डीफाटा, अंबड, डीजीपीनगर, कामटवाडेसह संपूर्ण भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते, तर अनेक ठिकाणी वीज खंडित झाल्याने अंधार पसरला होता. बंदावणेनगरात कारवर झाड पडले. यात दिलीप पाटील, प्रीतम पाटील, भूषण माळी, सारंग पाटील हे किरकोळ जखमी झाले. अग्निशामक दलाचे जवान नंदू व्यवहारे, प्रमोद लहामगे, राजेश हडस, श्रीराम देशमुख यांनी तत्काळ दाखल होत झाड बाजूला केले.

वीजपुरवठा खंडित
पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तर काही भागात विद्युत जनित्रांजवळ शॉर्टसर्किटचे प्रकार घडले.
बंदावणेनगरात कारवर वृक्ष कोसळला. यात कारमध्ये चौघे अडकले होते.

ठिकठिकाणी रस्त्यावर तळे
ऐन ऊन्हाळ्यात आलेल्या अवकाळी पावसाची तीव्रता इतकी होती की शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहत होते. अनेक ठिकाणी रस्त्यांची, ड्रेनेज लाइन आणि तर बाबींची कामे सुरू असल्याने खड्डेही पडले आहेत. त्यात पाणी साचल्याने दुचाकीस्वारांची पावसात मार्गक्रमण करताना मोठी तारांबळ होत असल्याचे पहावयास मिळाले.

व्यावसायिकांची धावपळ
शालिमार, मेनरोड, शिवाजीरोड, रेडक्रॉस, सातपूर मुख्य बाजारपेठ, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर, पंचवटी, गंगाघाटासह सर्वच ठिकाणी रस्त्यावरच दुकाने थाटलेल्या लहान-लहान व्यावसायिकांची अचानकपणे आलेल्या पावसाने आपला माल व साहित्य पावसापासून वाचविण्यासाठी चांगलीच धावपळ उडाली.

बातम्या आणखी आहेत...