आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या काही क्षणात स्वप्नांचा चिखल !:नाशिक सिन्नर तालुक्यात पावसाचे थैमान; शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात 165 मिमी जोरदार पाऊस झाल्याने गावातील लोकांना तडाखाला बसलाय. गुरुवारी (01 सप्टेंबर) ढगफुटीसदृश पावसामुळे शेकडो नागरिकांच्या घराचे नुकसान झाले. कित्येक घर उद्धवस्त झालीत. तर दुसरीकडे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. ऐन हंगामात शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय.

मदतीसाठी रास्ता रोको करणाऱ्या विस्थापितांशी चर्चा करताना प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार सागर मुंदडा आदींसह पदाधिकारी.
मदतीसाठी रास्ता रोको करणाऱ्या विस्थापितांशी चर्चा करताना प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार सागर मुंदडा आदींसह पदाधिकारी.

घरे गेली वाहून

दरम्यान, सरस्वतीला आलेल्या महापुराचा नदीकाठच्या लोकांना तडाखा बसला. 1969 नंतर 2022 मध्ये पहिल्यांदाच इतकी भयानक महापुराची परिस्थिती उद्भवल्याचे जाणकारांनी सांगितले. नदीकाठी वसलेल्या अनेक रहिवाशांची घरे या प्रवाहात वाहून गेली. याशिवाय नाशिक वेस, गणेश पेठ, नेहरू चौक, शिंपी गल्ली, भैरवनाथ मंदिराच्या समोरील आणि नाशिक वेशीमधील बाजारपेठेतील गाळ्यांमध्ये सुमारे तीन ते चार फूट पाणी घुसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

नदीकाठी वस्ती करून राहणारे काही नागरिकांची गरज या महापुरात गडप झाल्याने त्यांचे सर्वस्व निसर्गाने हिरावून नेले आहे. या महापुरात अनेक दुचाकी, चार चाकी वाहने डोळ्यादेखत वाहून गेली. त्याचबरोबर तीन ते चार तरुण बेपत्ता असून ते महापुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुराच्या पाण्यामुळे घरात घुसलेला गाळ काढताना नागरिक.
पुराच्या पाण्यामुळे घरात घुसलेला गाळ काढताना नागरिक.

असा झाला जिल्ह्यात पाऊस

नाशिक 13 मिमी, सुरगाणा 14.3, दिंडोरी 13, सिन्नर 165.3, कळवण ९, त्र्यंबकेश्वर 30, निफाड 7.6, इगतपुरी 20, देवळा 28, पेठ 9. हि आकडेवारी 02 सप्टेंबर सकाळी 10 वाजेपर्यंतची आहे. तर 01 सप्टेंबर चा पाऊस देखील मुसळधार होता. मालेगाव 62 मिमी, बागलाण 56.5 मिमी, सुरगाणा 55. 8 मिमी, इगतपुरी 101.5 मिमी, सिन्नर 80.9 मिमी, त्र्यंबकेश्वर 65. 6 मिमी असा पाऊस होता. तर सिन्नर तालुक्यात कालचा पाऊस हा 125 मिलीमीटर इतका होता.

सरस्वतीच्या पुराचे पाणी पडक्या वेशीतील पुलावरून वाहिल्याने पूल खचला गेला. प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठीसाठी बंद केला आहे.
सरस्वतीच्या पुराचे पाणी पडक्या वेशीतील पुलावरून वाहिल्याने पूल खचला गेला. प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठीसाठी बंद केला आहे.

सिन्नर तालुक्याला झोडपले

दरम्यान मागील दोन दिवसांपासून सिन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून पहिल्या दिवशी 80 मिमी तर दुसऱ्या दिवशी 125 मिमी तर काल रात्री तब्बल 165 मिलीमीटर पावसांची नोंद करण्यात आली आहे. एकूणच या पावसाने सिन्नर करांची दाणादाण उडवली असून सिन्नरच्या सरस्वती नदीला पूर आला आहे. शिवाय बाजारपेठेत पाणी शिरल्याने नाके नागरिक या ठिकाणी अडकून होते. रात्री उशिरापर्यंत या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते.

पुराच्या पाण्यात नदीकाठची घरे उध्वस्त झाली.
पुराच्या पाण्यात नदीकाठची घरे उध्वस्त झाली.

नदी पात्रात पाण्याची वाढ

गुरुवारी संध्याकाळी 6 ते 9 वाजेच्या सुमारास सिन्नर शहरासह परिसरात जोरदार पाऊस बरसला. या पावसाने ढग्या डोंगराच्या परिसरात असलेल्या बंधाऱ्याचा भराव खचण्याची शक्यता निर्माण झाल्याने माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून सांडवा फोडून दिला. साहजिकच बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाला. त्यामुळे आयटीआयच्या पाठीमागील बंधाऱ्यात एकाच वेळी पाण्याचा मोठा लोट आल्याने सांडव्यासोबतच पूर्वेकडच्या भागातून भरावावरून पाणी पडल्याने सरस्वती नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली.

घरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने उघड्यावर आलेला संसार.
घरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने उघड्यावर आलेला संसार.

नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल

परिणामी अरुंद झालेल्या नदीपात्रातून हे पाणी जागा मिळेल तिकडे धावू लागले. देवी मंदिर परिसरात ऐश्वर्या गार्डन पर्यंत तीन ते चार फूट पाणी आल्याने तेथील नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले. महसूल, नगरपालिका, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने येथील नागरिकांना दोन जेसीबींच्या सहाय्याने बकेटमध्ये बसून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सरस्वती पाणी नाशिकवेस भागात खासदार पूल ओलांडून भाजी बाजारात तसेच भैरवनाथ समोरील गाळ्यांच्या परिसरात विस्तारले गेले. हे पाणी थेट नेहरू चौकातील मूत्रक संकुलापर्यंत पोहोचले.

50 ते 60 घरांची पडझड

त्यामुळे परिसरातील सर्व व्यावसायिक आपापल्या गाळ्यांमध्ये अडकले गेले. त्यांनाही दोर बांधून प्रशासनाच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या पुरामुळे देवी मंदिरापासून संगमनेर नाक्यापर्यंत नदीपात्रात असलेल्या 50 ते 60 घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. अनेक नागरिकांचे संसार या महापुरात वाहून गेले. त्यामुळे बहुतेकांना अंगावरील कपड्यानीशी जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागले. पाण्याचा जोर ओसरल्यानंतर शुक्रवारी सकाळी नगरपालिका प्रशासन स्वच्छतेच्या कामात गुंतले होते. गाळ्यांमध्ये पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हाताशी झालेले व्यवसायिक स्वच्छतेच्या कामात गुंतले होते. तर बहुतेक नागरिक पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या गाड्यांचा शोध घेताना दिसत होते.

मदतीसाठी नागरिकांचा रस्ता रोको

सकाळचे 11 वाजले तरी प्रशासनाकडून कुठलीही मदत न मिळाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी संगमनेर नाका भागात एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, मनसेच्या ॲड. ओझा यांच्यासह स्थानिक नेत्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घातली. प्रांताधिकारी अर्चना पठारे, पोलीस उपाधीक्षक तांबे, प्रभारी तहसीलदार सागर मुंदडा, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत तीन दिवसात नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून मदतीसाठी त्याचा अहवाल तातडीने शासनास सादर करण्याचे आश्वासन दिले. देवी रोड भागातील विस्थापित नागरिकांची भगवती लॉन्स येथे तर अपना गॅरेज भागातील नागरिकांची भिकुसा लॉन्स मध्ये राहण्याची, खाण्याची व्यवस्था करण्यात आली.

जाळीला अडकलेल्या पानवेली पुराच्या पाण्याची साक्ष देतात.
जाळीला अडकलेल्या पानवेली पुराच्या पाण्याची साक्ष देतात.

नुकसान कोट्यवधींच्या घरात

सरस्वती नदीपात्राच्या दोन्हीकडेच्या अतिक्रमणधारक रहिवाश्यांच्या घरांच्या भिंती संसार वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक चार चाकी, दुचाकी वाहिल्या गेल्या. त्याचबरोबर नाशिक वेस आणि भैरवनाथ समोर, नेहरू चौकातील व्यवसायिकांच्या गाळ्यात पाणी शिरल्याने, नदीकाठची दुकाने, टपर्या वाहून गेल्या. नुकसानीचा हा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...