आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष:दिव्यांगांची शहर धान्य वितरण कार्यालयात धडक; दीड वर्ष उलटूनही अंत्योदय योजनेमध्ये समावेश नसल्याने संघर्ष

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीड वर्ष उलटूनही अंत्योदय योजनेत समावेश होत नसल्याने संतप्त दिव्यांगांनी आज शहर धान्य वितरण कार्यालयात धडक देऊन आंदोलन केले. प्रहार दिव्यांग संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. शासननिर्णय झालेला असताना व जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आदेश असतानाही शहर धान्य वितरण कार्यालयाकडून दिव्यांगांचा समावेश अंत्योदय योजनेत केला जात नाही.

सुमारे अडीचशे अर्ज प्रलंबित असून दिव्यांगांची अवहेलना या कार्यालयाकडून होत असल्याने नाशिक शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत प्रहार दिव्यांग संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला असून जिल्हाधिकारी, तत्कालीन जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनाही निवेदन दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने या कार्यालयास पत्रव्यवहार केला गेला. तरीही अद्याप दिव्यांग अंत्योदय योजनेपासून वंचित आहेत. प्रभारी धान्य वितरण अधिकारी कैलास पवार यांना प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. मनुष्यबळाची उणीव व ऑनलाइन प्रणालीत तांत्रिक बिघाड असल्याने विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच दिव्यांगांचा प्राधान्याने अंत्योदय योजनेत समावेश करून त्यांना अन्नधान्याचा लाभ देण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

पंधरा दिवसांत लाभ न मिळाल्यास तीव्र आंदोलन
पंधरा दिवसांत लाभ न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार दिव्यांग संघटनेचे नाशिक शहराध्यक्ष ललित पवार यांनी दिला. याप्रसंगी नाशिक तालुकाध्यक्ष रवींद्र टिळे, उपशहराध्यक्ष गणेश प्रधान, संघटक दत्ता कांगणे, भगूर शहराध्यक्ष चंद्रकांत वालझाडे, कल्पेश करंजकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...