आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरण:अनिल परब विरोधकांच्या रडारवर, गृह खात्यात हस्तक्षेप करीत असल्याची गृहमंत्र्यांची तक्रार

नाशिकएका वर्षापूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्र्यांचे “सल्लागार’ अशी प्रतिमा उभी राहत असलेले शिवसेनेचेे संसदीय कार्य तथा परिवहनमंत्री अनिल परब विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. परबांच्या हस्तक्षेपाबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे तक्रार केल्याचे बोलले जात अाहे. त्याच वेळी नेमके “वाझेंचा सरकारमधील ऑपरेटर कोण?’ हा सवाल उपस्थित करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नाव न घेता परब यांच्यावर निशाणा साधला आहे. गृह खाते तीन जण चालवत असल्याचा त्यांनी लगावलेला टोलाही याबाबत सूचक आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत “सहायका’ची भूमिका बजावणारे अॅड. परब विरोधकांच्या निशाण्यावर होते. अधिवेशनकाळातही मुख्यमंत्र्यांचे “सल्लागार’ या शब्दांत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी परबांचा अनेकदा जाहीर उल्लेख केला होता. परबांचे पक्षातील स्थान वाढल्याने शिवसेनेचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि दिवाकर रावतेंना अधिवेशनकाळात आपली असूया लपवता आली नव्हती.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे असोत वा नितेश राणेंनी आरोप केलेले युवा सेना नेते वरुण सरदेसाईंची खुलाशाची पत्रकार परिषद असो, सर्वच ठिकाणी परब यांचा संचार असतो. त्यामुळे त्यांचे “विशेेष’ स्थान लपून राहिलेले नाही. एनआयएचा तपास मुंबई पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचू शकतो, याचा सुगावा लागल्यावर बुधवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर दोन तास चाललेल्या प्रदीर्घ बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेकडून परब उपस्थित होते. विधिमंडळात ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ ची जबाबदारी संसदीय कार्यमंत्र्याकडे असते विशेषत: कोणत्याही अाघाडी सरकारमध्ये हे पद अत्यंत महत्वाचे ठरत असते. त्यामुळेच वकील, नगरसेवक आणि विधान परिषदेतील आमदार या परबांच्या अनुभवामुळे मुख्यमंत्र्यांची त्यांच्यावर अधिक भिस्त असल्याचे सांगितले जाते.

कोणत्या दुसऱ्या मंंत्र्याकडे विरोधकांचा रोख? : संजय राठोडांनंतर महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा येणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोन दिवसांपासून बोलत आहेत. गृहमंत्री हे खाते राष्ट्रवादीकडे अाहे अाणि गृहमंत्र्यांची शरद पवारांनी पाठराखण केल्याने अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची चर्चा बंद झाली आहे. अाता देशमुखांनीही परब यांच्या गृहमंत्रालयातील हस्तक्षेपाबाबत तक्रार केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच गृह खाते तीन जण चालवत असल्याचा टोला लगावून फडणवीसांनीही नाव न घेता परबांवर निशाणा साधला आहे.

बंगल्यासमोर गाडी ठेवल्यावर कुर्ता जाळून वाझेंनी पुरावा नष्ट केला
मुंबई | मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्काॅर्पिअो पार्क केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सचिन वाझे यांनी पीपीई किट खाली घातलेला कुर्ता राॅकेल टाकून जाळून टाकला, असे एनअायएच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी रात्री एनअायएचे तपास पथक त्यांच्या ठाणे येथील घराची झडती घेण्यासाठी गेले होते. तत्पूर्वी, मंगळवारी रात्री एक मर्सिडीज जप्त केली. तीत ५ लाखांची रोकड, नोटा मोजण्याचे मशीन व राॅकेलची बाटली आढळली. ही बाटली कुर्ता जाळण्यासाठी वापरल्याचे एनअायएच्या अधिकाऱ्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...