आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''देशात नाट्य क्षेत्रात सर्वाधिक कलाकार महाराष्ट्रातील असून त्या पाठोपाठ बंगालमध्ये आहेत. या दोन्ही राज्यात नाट्यप्रेमी अधिक असून नाशिकचे कवीवर्य वि. वा. शिरवाडकर, प्रा.वसंत कानेटकर व नटश्रेष्ठ बाबुराव सावंत यांच्या नावाने नाट्य पुरस्कार दिला जातोय याचा आनंद आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेतर्फे नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात नाट्य पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉ.जब्बार पटेल, पद्मश्री डॉ.मोहन आगाशे, लेखक संजय पवार, ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक गिरीश सहदेव, मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा.रवींद्र कदम, उपाध्यक्ष डॉ.अविनाश धर्माधिकारी, प्रमुख कार्यवाहक सुनील ढगे यांच्यासह नाट्य शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
टिव्ही मालिकांच्या काळात नाटकांकडेही कल
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, डॉ.जब्बार पटेल, डॉ.मोहन आगाशे यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी नाट्य व लेखन क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी नाट्य सृष्टीची अविरत सेवा केली आहे. मराठी नाट्य सृष्टी अजरामर करण्यात अनेक दिगग्ज कलाकारांनी आपले योगदान दिले आहे. सद्याच्या काळात चित्रपट आणि मालिका टीव्हीवर अधिक येत असल्या तरी नाटकाकडे अद्यापही मोठा कल असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुंबईचा महापौर असतांना वि.वा.शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मुंबईमध्ये नाट्यगृह व्हावे अशी इच्छा व्यक्त केली एक महिन्याच्या आत आपण नाट्यगृहासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची आठवण यावेळी उपस्थितांसमोर मांडत नाट्य क्षेत्रासाठी हातभार लावण्याची संधी आपल्याला मिळाली याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी डॉ.जब्बार पटेल, कुसुमाग्रज, दत्ता भट, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, काशिनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर,भक्ती बर्वे विजया मेहता, बाळ कोल्हटकर दिग्दर्शित यांच्या गाजलेल्या नाटकांबद्दल आपल्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी पद्मश्री डॉ.जब्बार पटेल, पद्मश्री डॉ.मोहन आगाशे, लेखक संजय पवार,ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक गिरीश सहदेव यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाहक सुनील ढगे यांनी केले.
यांचा झाला सन्मान
वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्काराने लेखक संजय पवार यांचा प्रा.वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्काराने सुप्रसिध्द सिनेनाट्य अभिनेते व ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांचा तर बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार नाशिकचे ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक गिरीश सहदेव यांना सन्मानीत करण्यात आले.
दत्ता भट स्मृती पुरस्कार अभिनय पुरुष दीपक करंजीकर, शांता जोग स्मृती पुरस्कार अभिनय स्त्री विद्या करंजीकर, प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार दिग्दर्शन प्रदीप पाटील, नेताजी तथा दादा भोईर स्मृती पुरस्कार लेखन दत्ता पाटील, पुरोहित स्मृती पुरस्कार - बाल रंगभूमी - सुरेश गायधनी, जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार सांस्कृतिक पत्रकारित धनंजय वाखारे,गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार- प्रकाशयोजना विनोद राठोड,प्रा.रामदास बरकले स्मृती पुरस्कार - लोककलावंत. जितेंद्र देवरे, शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार - शाहिरी पुरस्कार:राजेंद्र जव्हेरी,विजय तिडके स्मृती पुरस्कार - रंगकर्मी कार्यकर्ता राजेंद्र तिडके यांना प्रदान करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते नाशिकच्या सामाजिक क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या नारायण चुंबळे,निवृत्ती चाफळकर, संजय गिते, नितीन वारे , माजी आमदार जयवंतराव जाधव यांना विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.