आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांचा ‘पाॅवरप्ले’:स्वबळावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाविकास आघाडीतच निवडणूक लढवण्याचा नाशिक येथे दिला सल्ला

स्वबळावर शिवसेना भगवा फडकवणार हे मी गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून एेकत आलाेय अशी काेपरखळी मारतानाच सर्वच नेत्यांना पक्षविस्ताराची मुभा असून त्यात गैर काहीच नाही, अशी सारवासारव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी पत्रकारांशी दसरा मेळाव्यातील शिवसेनेच्या स्वबळावरील नाऱ्यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर केली. यानिमित्ताने पवार यांची मिश्किलीही चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलाे, लाेकांना सरकार आवडत असून माझा सल्ला असा असेल की भविष्यातील निवडणुकाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्षांनी लढवाव्यात.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील जाेरदार भाषणानंतर व्हिडिआे काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना ठाकरे यांनी भविष्यातील निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला हाेता. आपल्याला महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवायचा असून त्यासाठी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे, असे आवाहनही केले हाेते. या स्वबळावरील भगवा फडकवण्याच्या घाेषणेबाबत पवार यांचे लक्ष वेधले असते ते म्हणाले की, ‘शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या ३० वर्षांपासून ऐकत आलोय. आपला पक्ष माेठा करण्याचे स्वातंत्र्य सर्वांना असून त्यात गैर काही नाही. भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि लोकांना हे सरकार आवडत आहे. त्यामुळे जनतेच्या भल्यासाठी निर्णय घ्या हा माझा तिन्ही पक्षांना सल्ला असेल, असेही पवार यांनी सांगितले.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मंगळवारी रात्री मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. या वेळी पुढच्या निवडणुकीत स्वबळावर हिमतीवर मंत्रालयावर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना उद्धव यांनी मंगळवारी जिल्हाप्रमुखांना दिल्या. यंदा कोरोनाच्या महासाथीमुळे जिल्ह्यातील विकास कामांना पुरेसा निधी देणे शक्य झाले नाही. काळजी करू नका, आगामी वर्षी कसर भरून काढू, असा विश्वास उद्धवनी दिल्याचे समजते.

पंकजा माझ्या संपर्कात आल्याने उगा काेणी चिंता करू नये..

भाजपतील नाराज नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांनी माझ्याबद्दल काैतुकाचे केलेले ट्वीट डिलीट करण्याबाबत मला माहिती नसून साखर कारखान्याच्या प्रतिनिधी म्हणून एका बैठकीसाठी त्या आल्या होत्या. त्याचा राजकीय अर्थ काढणे याेग्य नाही. मुळात, मुंडे माझ्या संपर्कात आल्याने भाजपच्या काही नेत्यांना चिंता वाटत असेल तर त्याबाबत मला माहिती नसल्याचा टाेला लगावला.

मराठा आरक्षण सुनावणीबाबत उगाच टिप्पणी करणे अयाेग्य

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवरील सुनावणीला सरकारी वकील गैरहजर राहिले व त्यामुळे सुनावणी पुढे गेली याबाबत विचारले असता पवार यांनी या मुद्द्यावरून उगाच सरकारला लक्ष्य केले जात असल्याचे मत व्यक्त केले. ज्येष्ठ वकील त्यांच्या वेळेनुसार जात असतात. न्यायाधीश ही वेळ देतात, असे सांगत पवार यांनी उगाच टिप्पणी करणे याेग्य नसल्याचे स्पष्ट केले.

..ताे निर्णय प्रदेशाध्यक्षांचा... :

राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राबवला जाईल का, तिन्ही पक्ष एकत्र लढतील का असे प्रश्न केल्यानंतर पवार यांनी यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच अन्य पक्षाचे पदाधिकारी याबाबत निर्णय घेतील असे स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...