आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाफेडचा कांद्या विक्रीसाठी बाहेर पडू देणार नाही, वेळ पडल्यास तो जाळून नष्ट केला जाईल, असा इशारा देतानाच आयकर व ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाढीनंतर जर कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या तर त्यांचे हात तिथेच छाटू असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष ललित बहाळे यांनी येथे दिला.
येथील बाजार समिती आवारात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे कांदा उत्पादन व व्यापार परिषद झाली. राज्यभरातून संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. येत्या ३० जूनपर्यंत वाणिज्य तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांची भेटीसाठी वेळ मागण्यात येईल. त्यानंतरही वेतन न मिळाल्यास हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन संसदेला घेराव घालण्याचा इशाराही ज्येेष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील व बहाळे यांनी दिला.
ज्यांनी नाफेडला कांदा विकला त्यांनीही या आंदोलनात सामील व्हा. बांगलादेशसारख्या देशाने सौदे पूर्ण केले जात नाही म्हणून आपला कांदा विकत घ्यायचा नाही, असा निर्णय घेतला. आखाती देशांनी सुद्धा येमेनमधून कांदा खरेदी सुरू केल्याने निर्यातबंदीच्या धोरणामुळे आपल्या कांद्यावर गदा आल्याची वेळ आल्याचे मत बहाळे यांनी व्यक्त केले.
माजी आमदार वामनराव चटप म्हणाले, जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतिबिंब जोपर्यंत सरकारमध्ये उमटत नाही तोपर्यंत सरकार जनतेसाठी निरुपयोगी असते. ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील म्हणाले, जोपर्यंत जीवनावश्यक यादीतून कांदा वगळला जात नाही तोपर्यंत कांद्याचे भाव असेच कोसळत राहणार आहेत. महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सीमा नरवडे म्हणाल्या, केंद्र सरकार नेहमी निर्यातबंदीच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करत असल्याने कांद्याचे दर पडतात. नाफेड ही शेतकऱ्यांसाठी व्यवस्थाच नसून ही व्यवस्था बंद करायला हवी असे मत देविदास पवार यांनी मांडले.
युवा आघाडीचे अध्यक्ष सुधीर बिंदू यांनी नाफेडचा कांदा विक्रीसाठी आणल्यास त्याच ठिकाणी तो जाळून टाकू, नाफेडची राज्यातील कार्यालये बंद पाडू असा इशारा दिला. शंकरराव ढिकले यांनी ठराव मांडले. संतू पाटील झांबरे यांनी स्वागत केले तर शशिकांत भदाणे, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रज्ञाताई बापट, मधुसूदन हरणे, राजाभाऊ पुसदेकर, अनिस पटेल, किरण पाटील, बाबासाहेब गुजर यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन बापूसाहेब पगारे यांनी केले.परिषदेच्या सुरुवातीला ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील यांचा ८१ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट उपस्थित होते.
परिषदेतील पारित ठराव
-कांद्यासहित सर्व शेतीमाल आवश्यक सूचीतून कायमस्वरूपी वगळावा.
-प्रसारमाध्यमांनी कांदा भाववाढ वा भाव कोसळल्याच्या बातम्या अतिरंजित करण्याचा मोह टाळावा.
-वित्तीय व अर्थशास्त्रीय परिणामाचे मूल्यमापन प्रसारित करावे.
-कांद्यासह सर्व शेतीमालाच्या आयात-निर्यातीवरील सरकारी नियंत्रण कायमस्वरूपी संपुष्टात आणावे.
-कांद्यावर सरकारने साठा मर्यादा बंदी लादू नये.
-कांदा बफर स्टॉकची मर्यादा २.५ लक्षावरून वाढवून ४ लक्ष टणावर निर्धारित केल्याचे ही परिषद निषेध करते.
-ईडी-आयटीच्या छापे सत्रामुळे व्यापाऱ्यांचे मनोबल तर खच्ची होतेच पण जे वित्तीय नुकसान सहन करावे लागते ते प्रामुख्याने शेतकऱ्याला.
- ईडी-आयटीच्या कर्मचाऱ्यांना आवाहन की त्यांनी विवेक बुद्धीचा वापर करून नोकऱ्या कराव्या.
- माथाडी कामगार कायदा रद्द करावा
-निर्यातीवर विपरीत परिणाम करणाऱ्या सर्व अटी सरकारने परत घ्याव्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.