आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आपद्वारे  कर भरल्यास चार टक्के मिळणार सवलत; एनएमसी वॉटरटॅक्स अ‍ॅप प्ले स्टोअरवरही

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेचे पाणीपट्टीचे ऑनलाइन अ‍ॅप नागरिकांच्या सेवेत दाखल झाले असून पाणीपट्टीची संपूर्ण रक्कम भरल्यास चार टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून करदात्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार असून त्यासाठी अ‍ॅपद्वारे पाणीमीटरचे रिडिंग घेऊन अ‍ॅपवर अ‍ॅपलोड केल्यास पाणीपट्टीचे देयक तत्काळ उपलब्ध होऊ शकणार आहे.

पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा सव्वाशे कोटींवर गेला आहे. पाणीपट्टीची देयके दर तीन महिन्यांनी नळ कनेक्शनधारकांना वाटप केली जाणे आवश्यक आहे. मात्र, पालिकेच्या करवसुली विभागातील मनुष्यबळाच्या अभावामुळे अनेक भागात गेली कित्येक वर्षे पाणीपट्टीची देयके वाटप होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे पाणीपट्टीच्या थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी ऑनलाइन अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या अ‍ॅपद्वारे नागरिकांना स्वत:चे पाणीपट्टी देयक तात्काळ मिळविता येणार आहे. आॅनलाइन पाणीपट्टी भरणाऱ्यांना सद्यस्थितीत एक टक्का सवलत दिली जाते. आता पाणीपट्टीचे देयक निर्धारित मुदतीत भरल्यास आणखी तीन टक्के सवलत दिली जाईल. त्यामुळे पाणीपट्टीधारकांना एकूण चार टक्के सवलतीचा लाभ घेता येईल. या अॅपचा नळजोडणीधारकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व नळजोडणीचे देयक स्वतः प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त रमेश पवार व उपआयुक्त अर्चना तांबे यांनी केले आहे.

नळजोडणीधारकास गुगल प्ले स्टोरवरून ‘एनएमसी’ वॉटर टॅक्स अॅप मोबाइलवर डाऊनलोड करता येईल. त्यावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने अॅपद्वारे विचारलेल्या माहितीच्या नोंदी पूर्ण करुन रजिष्टर करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ज्या कालावधीमध्ये महापालिकेतर्फे अॅप जलमापकाचे वाचन करण्यासाठी ( छायाचित्र ) मेसेज प्राप्त होईल, त्या कालावधीत नळजोडणीधारकाने लॉगीन करणे, नळजोडणीचा परमनंट, आयडी इंडेक्स क्रमांकाची नोंद करणे आणि त्यानंतर आपल्या पाणी मीटरचा फोटो काढून अपलोड करावा लागेल. फोटो अपलोड केल्यानंतर महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षात त्याची फेरतपासणी करून तत्काळ देयक पाठविले जाईल. हे देयक नागरिकांना ऑनलाइन भरण्याची सुविधाही अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...