आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलोखा बिघडवण्याचे काम:महागाई-रोजगार मुद्द्यांकडे दुर्लक्ष, फक्त सत्तेसाठी राम अन् अयोध्याकडे लक्ष; शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक येथे हिंदू मजदूर सभेच्या कार्यक्रमात शरद पवारांचा सत्कार करण्यात आला. - Divya Marathi
नाशिक येथे हिंदू मजदूर सभेच्या कार्यक्रमात शरद पवारांचा सत्कार करण्यात आला.

देशाचे अर्थकारण ज्या कामगार आणि शेतकऱ्यांवर अवलंबून आहे त्यांच्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. वाढती महागाई, मुंबईतील मराठी कामगारांच्या कुटुंबांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. मात्र, सत्तेसाठी केवळ राम आणि अयोध्या या मुद्द्यांकडे लक्ष देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सध्या केंद्र सरकार करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी केली.

हिंद मजदूर सभेचा अमृतमहोत्सव हा देशभरात साजरा करण्यात येत असून या महोत्सवाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस यू एस जिमखाना येथे झाले. या वेळी पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पवार म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या कामगार धोरणामुळे कामगार आणि संघटना या परावलंबी झाल्या आहेत. कामगारांना त्यांचा हक्क हवा असेल तर संघटनांच्या माध्यमातून एकजूट दाखवावी लागेल. पूर्वी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होती.

या ठिकाणी ११० गिरण्या होत्या. त्या माध्यमातून गिरण्या, पेटलेल्या चिमण्या, कामगार, चाळी आणि भोंग्याचा आवाज येत होता. परंतु आता या चाळी नष्ट झाल्या असून या ठिकाणी ३० ते ४० मजल्यांची इमारती तयार झाल्याने सर्वसामान्य मराठी कामगार हद्दपार झाले. याला केंद्र सरकारची चुकीची आर्थिक नीती कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच सध्याचा काळ हा सोकावलेला असल्याने कामगारांनी जागे राहण्याची गरज आहे. या लाल टोपीमुळेच तुमचे डोके शाबूत असल्याचे पवारांनी या वेळी सांगितले. या वेळी हिंद मजदूर सभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस हरभजन सिद्धू यांनीही केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी कायद्याविरोधात आरोप केला.

केंद्र सरकारने आता चलनी नोटांऐवजी डिजिटल चलनाला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सर्व कामगारांचे आयुष्य हे धोक्यात आले आहे, असे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी या वेळी सांगितले.

अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे माझे गृहमंत्रिपद गेले : भुजबळ नोट प्रेस आणि एचएएल हे नाशिक जिल्ह्यातील असल्याने अभिमान वाटतो. परंतु ते अद्यापही महाराष्ट्रात असल्याने याचाही गर्व वाटतो. प्रेसच्या गंगाप्रसाद या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे माझ्यावर खोटे आरोप झाले होते आणि या आरोपामुळे माझे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपद गेले होते. परंतु केंद्रात अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असल्याने सरकार नीट होते. त्यामुळे सत्याचा विजय झाला आणि माझे त्या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे समोर आले.