आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणावर महागल्यानंतर केंद्र सरकारने आयात कर व कृषी सेस शून्य टक्के केला होता, या दिलेल्या मोठ्या सवलतीचा परिणाम प्रत्यक्ष बाजारात दिसायला लागला आहे. केवळ पंधराच दिवसांत खाद्यतेलाचे दर किरकाेळ बाजारात लिटरमागे ५ ते ४५ रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे, इंडोनेशियातून नियमित झालेली पामतेलाची आयात आणि देशात मान्सूनचे वेळेवर झालेले आगमन, त्यामुळे चांगले तेलबियांचे पीक हाती येण्याची सुचिन्हे व खाद्यतेलाची कमी झालेली मागणी याचा एकत्रित परिणामस्वरूपी येत्या काळात हे दर आणखी स्वस्त होतील. भारत सूर्यफुलाचे तेल रशिया, युक्रेन व अर्जेंटिना या तीन देशातून तर पाम तेलाची आयात इंडोनेशिया व मलेशियातून मोठ्या प्रमाणावर करतो. मार्च महिन्यात रशिया व युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्याने सूर्यफूल तेलाची आयात ठप्प झाली ती अजूनही प्रभावित आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात पामची फळे झाडावरच वाया गेली, यामुळे तेथे खाद्यतेलाचे संकट निर्माण झाले व या देशाने पामतेलाची निर्यात बंद केली होती याचा परिणाम भारतात अगाेदरच महागात असलेल्या खाद्यतेलाच्या दरांचा भडका उडाला होता. मात्र, अर्जेंटिनाकडून सूर्यफूल तेलाची आयात सुरू झाली आणि इंडाेनेशियाने निर्यातबंदी उठवली तर भारत सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील आयात शुल्क पूर्णपणे माफ केल्याने मोठ्या आयातकारांना प्रोत्साहन मिळाले. तर इकडे पावसाळा सुरू झाल्याने भारतीय बाजारात खाद्यतेलाची मागणी कमी झाल्याने सर्वच खाद्यतेलाचे दर स्वस्त झाले असून ते अजून स्वस्त होणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.