In 2 Months, Give The Rightful Lands To The Tribals In The Name Of Satbari
माजी आमदार जे. पी. गावीत यांचा शासनाला अल्टीमेटम:2 महिन्यात आदिवासींच्या हक्काच्या जमिनी सातबाऱ्यासह नावावर करा
नाशिक8 दिवसांपूर्वी
कॉपी लिंक
पंधरा हजार आदिवासी बांधवांनी सोमवारी (20 जून) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर वनजमिनीच्या हक्कांसाठी मोर्चा काढला. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार जे. पी. गावीत यांनी राज्यशासनाला दोन महिन्यापर्यंत सर्व आदिवासी बांधवाना त्यांच्या हक्काच्या जमिनी सातबाऱ्यासह त्यांच्या नावावर करण्याची मागणी केली, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
या आहेत मागण्या
माक्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्रंबकेश्वर, इगतपुरी, देवळा, येवला, नांदगाव, बागलाण तालुक्यातील आदिवासी बांधवानी हक्काच्या वनजमिनींचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी
अपात्र दावे पात्र करा, वनाधिकार कायद्यानुसार पात्र दावेदारांच्या कब्जेवहीवाटीत असलेली 10 एकरपर्यंतच्या जमिनी मोजुन त्याचा नकाशा तयार करुन त्याचा सातबारा तयार करावा.
पात्र दावेदारांचे नाव सातबारा उताऱ्यावर कब्जेदार सदरी लावून ती जमीन लागवडीस योग्य असल्याचा शेरा मारावा.
नार, पार, तापी, नर्मदा, दमनगंगा, वाघ पिंजाळ या नद्याचे पाणी नद्या जोड प्रकल्पाद्वारे गुजरात व मुंबईला नेवुन स्थानिक आदिवासींना विस्थापीत करुन त्यांना देशोधडीला लावणार प्रकल्प रद्द करावा.
पश्चिम वाहिनी नद्या नाल्यांवर सुरगाणा, पेठ, त्रंबक या तालुक्यातील 77 लघुपाट योजना प्रस्तावित कराव्यात, जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर पाणी पुरवठ्यांच्या योजना ठेकेदारांकडुन मुदतीत व प्रामाणिकपणे पूर्ण कराव्या.
गरजू आदिवासी कुंटूबाना प्रधान मंत्री आवास ड घरकुल योजना तात्काळ मंजूर करून घराची किंमत 3 लाख रुपये करण्यात यावी. आदिवासींच्या राखीव जागांवर बोगस आदिवासींची केलेली भरती रद्द करुन आदिवासींना नोकऱ्या देण्यात याव्या.
नाशिक जिल्ह्यातील कांदा लागवडीच्या खर्चाच्या दीडपट भाव द्यावा.
चणकापूर धरणातील पाणी कळवण शहराला पाइपलाइनद्वारे पुरविणारी नळ पाणीपुरवठा योजना रद्द करून गिरणा काठच्या 17 ते 20 बागाईत गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्या.
विविध मागण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष अशोक ढवळे, माजी आमदार जे पी गावित, डॉ डी. एल. कराड, सचिन मालेगावकर, इरफान शेख, शशी उनवणे, सुनील मालुसरे, रमेश औटे, अशोक खालकर भिका राठोड, सावळीराम पवार, इंद्रजित गावीत, हनुमान गुंजाळ, रमेश चौधरी, सुभाष चौधरी, वसंत बागुल, रामा महाले यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर प्रशासनाकडून जिल्हाधिकारी गंगाथरन डी, अप्पर आयुक्त भानुदास पालवे, उपायुक्त गोरक्ष गाडीलकर, उपवनसरंक्षक पंकज गर्ग यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.