आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठ वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचं दिवाळे वाजले. महागाई व बेराेजगारीने उच्चांक गाठला. पेट्राेल डिझेलची माेठ्या प्रमाणात दरवाढ झाली. मात्र पंतप्रधान माेदींना याच्याशी काहीही देणे घेणे नाही. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने देशात धार्मिक दुही माजविण्याचा मार्ग अवलंबला असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे शुक्रवारी (ता. 3) नाशिक दाैऱ्यावर होते. काँग्रेस भवन येथे त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसची भूमिका त्यांनी मांडली.
लोकशाहीचा गळा घोटला जात आहे
ते म्हणाले, भाजप सरकार लाेकशाहीचा गळा घाेटल्याशिवाय राहणार नाही. भाजपला राेखण्यासाठी समविचारी पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याची गरज आहे. राजस्थानच्या जयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या देशव्यापी चिंतन शिबिरातील घडामोडींचा परामर्श घेताना राज्यातही 2 जून रोजी काही ठिकाणी शिबिरे घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
काँंग्रेसला चिंतनाची गरज
पक्षाला पुन्हा नवचैतन्य प्राप्त करून देण्यासाठी सध्या देशपातळीवर पूर्ण वेळ अध्यक्ष, चिंतन शिबिर आणि संघटनात्मक निवडणूक यावर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. देशभरात काँग्रेसची पाळेमुळे रुजलेली असून पक्षाच्या नेतृत्वाखाली समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला राेखण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्रही सोडले.
बंदूकीच्या जोरावर प्रश्न सुटत नाही
महागाईचा निर्देशांक 8 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. रुपयाची किंमत घसरली आहे. सत्तेसाठी भाजपाने आतापर्यंत विविध मार्ग अवलंबले असून, आगामी निवडणुका सत्तेच्या रुपाने कॅश करण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणाचा हीन मार्ग अवलंबल्याचेही त्यांनी सांगितले. काश्मिरचा प्रश्न अतिशय गंभीर असून हा प्रश्न बंदुकीच्या जाेरावर अथवा इंटरनेट बंद करुन हा प्रश्न सुटणारा नाही. यासाठी चर्चेतून मार्ग काढावा लागेल. सध्या तरी पक्षापुढे पक्ष वाढविणे आणि भाजपाच्या पराभवासाठी लढणे हेच दोन महत्वाचे मुद्दे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे समर्थन करताना महाआघाडीतून भाजपाला रोखणे शक्य असल्याचा पुनरुच्चार कऱतानाच 3 पक्षांच्या माध्यमातून सरकार चालवणे फार अवघड असून सरकारला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवावा असे आवाहनही त्यांनी केले. भाजप सुडाचे राजकारण करत आहे. साेनिया गांधी व राहुल गांधी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावला आहे. मात्र कितीही दहशत केली तरी आम्ही घाबरणार नाही. न्यायालयात लढा देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस माजीमंत्री शोभा बच्छाव, माजी खासदार प्रतापराव वाघ, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, उध्दव पवार, वसंत ठाकुर, वत्सला खैरे, बबलु खैरे, कल्पना पांडे, स्वप्नील पाटील, राजेंद्र बागूल, हनीफ बशीर आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.