आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्री पवारांची घोषणा:​​​​​​​स्वप्निलचा बळी गेल्यावर लोकसेवा आयोगावर सदस्य नेमण्याची उपरती; 31 जुलैपर्यंत सदस्यांच्या रिक्त जागा भरणार

मुंबई/ नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत व नियुक्ती रखडल्यामुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरचा विषय पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ऐरणीवर आला. येत्या ३१ जुलैपर्यंत लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागा भरून भरती प्रक्रिया गतिमान करण्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. गेल्या तीन वर्षांपासून राज्य लोकसेवा आयोगाच्या चार जागा रिक्त असल्याने नियुक्ती प्रक्रिया रखडल्यामुळे स्वप्निल लोणकरसारखे हजारो विद्यार्थी नाउमेद झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडला. त्यावर सरकारच्या वतीने पवारांनी ही घोषणा केला.

अभियांत्रिकी श्रेणीत लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दीड वर्ष मुलाखत न झाल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्यावर राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही नियुक्ती न मिळालेल्या ४१३ उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘नियुक्ती द्या किवा आत्महत्येची परवानगी द्या,’ अशी जीवघेणी विनंती केली होती. याचा संदर्भ राज्यभर आंदोलने घेऊन फडणवीस आणि मुनगंटीवार यानी एमपीएससीच्या उमेदवारंच्या व्यथा मांडल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियुक्त्या व कामकाजातील त्रुटी दाखवून स्वप्निलच्या कुटुंबास ५० लाखांची मदत करण्याची मागणी केली. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत आयोगाच्या रिक्त पदांच्या नियुक्त्या करणार असल्याची घोषणा केली.

वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि पोलिस प्रशासन या तीन खात्यांतील रिक्त जागा भरणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले, मात्र, यापैकी कोणत्या जागांवर किती उमेदवारांची नियुक्ती कधीपर्यंत करणार हे स्पष्ट केले नाही. स्वप्निल उत्तीर्ण झालेली परीक्षा राज्य अभियांत्रिकी सेवेसाठी होती. अभियांत्रिकीच्या १२०० पदांसाठी झालेल्या या परीक्षेत ३,६७१ उमेदवार उत्तीर्ण झाल्याची व त्यांची मुलाखत प्रक्रिया गेले वर्षभर रखडल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. मात्र, त्यांच्या नियुक्त्या नेमक्या कधीपर्यंत करणार याची मुदत स्पष्ट केली नाही.

राज्यभर आंदोलन

  • स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटले.
  • एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली.
  • मनसेतर्फे वाशीपासून पायी मोर्चा काढण्यात आला होता.
  • भाजप आमदार राम सातपुते यांनी विधिमंडळाच्या आवारात अांदोलन केले.

लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागा भरणार, प्रशासनातील पदांचीही भरती केव्हा?

  • गेल्या तीन वर्षांपासून शासनाने लोकसेवा आयोगाच्या ४ रिक्त जागांवर सदस्यांची नियुक्ती केली नाही.
  • परिणामी, अध्यक्ष आणि एक सदस्य अशा दोघांवरच आयोगाचे कामकाज सुरू होते त्यामुळे स्वप्निलसारख्या उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांच्या मुलाखतींना व नियुक्त्यांना विलंब होत होता.

आयोगाच्या नियुक्त्यांना ३१ जुलैची प्रतीक्षा का ?
आयोगाच्या रिक्त पदांमुळे एमपीएससीचा कारभार मागे पडला आहे. त्याचाच परिणाम स्वप्निलसारखा होतकरू युवक बळी ठरला आहे. अन्य महामंडळांच्या नियुक्त्या होत असताना, सरकारला आयोगाच्या रिक्त जागांसाठी ३१ जुलैपर्यंत थांबण्याचं काय कारण आहे? या नियुक्त्या तत्काळ कराव्यात आणि परीक्षा पास केलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

२०१९ पासून रखडलेली राज्य लोकसेवा आयोगाची ७७५ जागांची भरती प्रक्रिया
क्र. पद परीक्षेचा दिनांक पात्र उमेदवार
१. राज्यसेवा १३ जुलै २०१९ ४१३
२. कक्ष अधिकारी २५ ऑगस्ट २०१९ २४
३. मंत्रालय लिपिक १६ एप्रिल २०१९ १७९
४. दुय्यम निरीक्षक १६ एप्रिल २०१९ ३३ राज्य उत्पादन शुल्क
५. कर सहायक ३ नोव्हेंबर २०१९ १२६
एकूण पात्र उमेदवार ७७५

बातम्या आणखी आहेत...