आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ये-जा करण्यासाठी निर्बंध असलेल्या महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण अकादमीत गेल्या आठ दिवसांत १६७ प्रशिक्षणार्थी कोरोनाबाधित आढळले असून गुरुवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हा आकडा १७१ वर गेला आहे. त्यांच्या संपर्कातील तसेच येत्या दोन दिवसांत नव्याने पाचशे प्रशिक्षणार्थींच्या रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने घेतला आहे. बाधितांपैकी १२१ प्रशिक्षणार्थींना ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. ऑक्सिजनची कमतरता असलेल्या रुग्णांना मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. त्र्यंबक रोडवरील पोलिस अकादमीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत काटेकोर नियमावली आहे. या ठिकाणी उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यभरातून उमेदवार दाखल झाले आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण तसेच फिजिकल डिस्टन्स ठेवून शारीरिक प्रशिक्षण दिले जाते होते. अलीकडेच प्रशिक्षणार्थींना नियमित व साप्ताहिक सुट्यादेखील सुरू झाल्या. १५ डिसेंबरपूर्वी विवाह सोहळ्यासाठी सुटीवर गेलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना परत आल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तपासणी केली. त्यात ते कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील ४२१ प्रशिक्षणार्थींचे स्वॅब तपासण्यात आले. त्यात १५१ बाधित आढळले आहेत.
५०० संशयितांची तपासणी सुरू
पीटीसीमध्ये सातशे प्रशिक्षणार्थी असून मेस कँटीन, वसतिगृह व अन्य असे सातशे असे एकूण १४०० जण असतात. त्यातील ८९४ जणांची तपासणी झाली असून उर्वरित ५०६ जणांची तपासणी केली जाणार आहे. बाधितांच्या संपर्कातील लोक बाहेरगावी असतील तर वैद्यकीय विभागाला कळवले जाणार आहे.
१५ जण अँटिजनमध्ये बाधित... :
मोठ्या संख्येने बाधित आढळल्यानंतर महापालिकेनेही वेळ न दवडता नव्याने ४७२ प्रशिक्षणार्थींची रॅपिड अँटिजन टेस्ट केल्यावर त्यात १५ प्रशिक्षणार्थी बाधित आढळले. स्वॅब व रॅपिड अँटिजन मिळून एकूण ८९४ तपासण्या करण्यात आल्या असून त्यात १६७ बाधित झाले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.