आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडोंगरावर पाण्याची साठवणूक करून झाडांना पाणी मिळावे यासाठी बचत गटांच्या ४० महिलांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने दरी येथील अडीच्या डोंगरावर 40 फुट लांबीचा दगडी बांध व समतर चर श्रमदानातून खोदली. श्रमदानातून उभारललेल्या या कामामुळे डोंगरावर पाण्याची साठवणूक होताना तेथे लागवड करण्यात येणाऱ्या 3 हजार झाडांना मिळणार पाणी आहे.
जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभाग, दरी येथील महिला बचत गट व ग्रामपंचायतीच्या वतीने अडीचा डोंगरावर जलसंधारणासाठी श्रमदानातून चर खोदण्याचे काम केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभागांतर्गत दरी येथे पावसाचे पाणी संकलनाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी येथे छतावरील पावसाचे पाणी संकलनासाठी शोषखड्डे करण्यात आले. पुढील टप्प्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून घरोघरी पाऊस पाणी संकलनासाठी शोषखड्डे करण्यात येणार आहेत. दरी गावाजवळील अडीचा डोंगर येथे वृक्षलागवड करण्यात येणार असून पावसाचे पाणी वाहून जाऊ नये यासाठी गावातील बचत गटातील महिला, जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता कक्षातील अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक यांनी श्रमदानातून सलग समतर चर चे काम पूर्ण केले. पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी स्वतः या मोहिमेत सहभागी होत श्रमदान केले. मोहिमेत जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील कर्मचारी, ग्रामसेवक सचिन पवार, ग्रामपंचायत सदस्या सुनीता बेंडकोळी, शीतल पिंगळे, सारीका भोई, राधा बेंडकोळी आदींसह बचत गटातील महिला सहभागी झाल्या होत्या.
एनएसएसच्या मदतीने खोदल्या 50 चर
अडीच्या डोंगरावर सुमारे 3 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी खड्डे देखील खोदून ठेवण्यात आले आहे. डोंगराच्या खालील भागावर असलेल्या झाडांना चरीव्दारे अडवणूक केलेले पाणी झिरपून मिळणार आहे. त्यासाठी एनएसएस कॅम्पच्या माध्यमातून यापुर्वीच 50 चर खोदून ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण डोंगरावर ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक सचिन पवार यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.