आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील महापालिकेच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील जलपरी नादुरुस्त झाल्याने शनिवारपासून (दि. ३१ डिसेंबर) पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी रुग्णालयातील रुग्णालयातील प्रसूती शस्त्रक्रिया थांबल्या असून साेमवारपर्यंत १० गर्भवतींना प्रसूतीविनाच घरी पाठविण्याची नामुष्की रुग्णालयावर आेढवली आहे. संबंधितांना तातडी भासल्यास खासगी रुग्णालयात उपचार घेणे भाग पडल्याने आर्थिक भुर्दंड साेसावा लागला. तसेच रुग्णालयात पिण्यासाठीही पाणी नसल्याने रुग्णांचीही गैरसाेय झाली. दरम्यान, मनपाचे ठाकरे रुग्णालय हे विविध कारणांमुळे कायम चर्चेत असते. यातच आता जलपरी नादुरुस्त झाल्याने तीन दिवसांपासून रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट असल्याची बाब उघड झाली आहे. पाणी नसल्याने रुग्णसेवेचे कामकाज बंद ठेवण्याची वेळ रुग्णालयावर आली आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जात असले तरी यास पालिकेचे विभागीय अधिकारी हेच जबाबदार असल्याचे रुग्णांसह स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितले.
शनिवारी पाणीपुरवठा ठप्प झाल्याने रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवतींची माेठी कुचंबणा झाली. प्रसूती शस्त्रक्रिया खाेळंबल्याने रुग्णालयाने या महिलांना घरी जाण्यास सांगितल्याने गर्भवतींसह त्यांच्याबराेबर आलेल्या नातेवाइकांना चिंतेने ग्रासले.
आता काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला. खासगी रुग्णालयात आता जावे लागणार असल्याने त्यांची चिंता वाढली हाेती. प्रसूतीची वेळ जवळ येऊन ठेपलेल्यांची तर स्थिती अधिकच गंभीर हाेती. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात जावे लागल्याने आर्थिक भुर्दंड बसला. कोविडकाळात या रुग्णालयात दररोज शेकडाे रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र त्यानंतर या रुग्णालयाचा कारभार संपूर्णपणे महापालिका अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची दुर्दशा होत असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णालयात नाशिकराेडसह परिसरातील गावांमधून रुग्ण उपचारासाठी येत असतात. परंतु, पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रुग्णांच्या उपचाराकडे दुर्लक्ष होत आहे.
पाणी नसल्याने घरी पाठवले मुलीला प्रसूतीसाठी दोन दिवसांपासून ठाकरे रुग्णालयात दाखल केले आहेत. संबंधित डॉक्टरांनी प्रसूतीची वेळही दिली आहे, मात्र या रुग्णालयात पाणी नसल्याने घरी पाठविण्यात आले. ज्यावेळी ‘इमर्जन्सी’ असेल तेव्हा घेऊन या, असे उत्तर दिले गेले. - निवृत्ती भोर, रुग्णाचे पालक
पाणीपुरवठा सुरळीत जलपरी नादुरुस्त असल्याने शनिवारपासून ठाकरे रुग्णालयाचा पाणीपुरवठा ठप्प हाेता. याची माहिती पालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना दिली हाेती. दरम्यान, साेमवारी जलपरी दुरुस्त केल्याने दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला. - डाॅ. जितेंद्र धनेश्वर, प्रमुख, ठाकरे रुग्णालय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.