आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाेळक्यांकडून लुटमार:लुटमारीच्या घटनांनी औद्याेगिक वसाहतीतील कामगारांमध्ये भीती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर औद्याेगिक वसाहतीत रात्रीच्या वेळी कामाहून सुटणाऱ्या कामगारांची टाेळक्यांकडून लुटमार केली जाते. टवाळखाेर स्थानिक गुंड असल्याने त्यांच्याविराेधात भीतीपाेटी कामगार तक्रार न करता मुक्याचा मार सहन करतात. औद्याेगिक वसाहतीत शहराच्या विविध भागांसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल, जातेगाव, मुळेगाव, माेखाडा, ताेरंगण आदी भागातील कामगार कामानिमित्त येत असतात.

वेळेत उत्पादन पूर्ण हाेण्यासाठी बहुतांश कामगारांना व्यवस्थापनाकडून आेव्हर टाइम करण्यास सांगितले जाते. त्यामुळे कामगारांची रात्रीच्या वेळी सुटी हाेते. बाहेरून आलेले कामगार औद्याेगिक वसाहतीतून पायीच त्र्यंंबकराेडपर्यंत येतात व तिथून मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावाकडे रवाना हाेतात. याचाच फायदा घेत स्थानिक टवाळखाेरांकडून कामगारांना मारहाण करून त्यांची लुटमार केली जाते.

मळे परिसरातील कामगारांचीही सर्रास लूट
औद्योगिक वसाहतीप्रमाणेच विविध ठिकाणी कामानिमित्त जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना लुटमारीचा त्रास सहन करावा लागतो. स्वस्तात रूम भाड्याने मिळते म्हणून अनेक कामगार मळे परिसरात राहतात. बहुतांश कामगार बांधकामाची कामे करतात. अशा कामगारांना दर आठवड्याला पगार दिला जातो. या कामगारांनाही नासर्डी नदीच्या पुलावर अडवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात.लुटमार करणारे परिसरातील असल्याचा संशय असून पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याची तक्रार कामगारांकडून केली जात आहे.

पाेलिसांनी गस्त घालून कारवाई करावी
आैद्याेगिक वसाहतीतील कामगारांचे वेतन १ ते १० तारखेपर्यंत हाेत असल्यामुळे या कालावधीतच कामगारांना लुटण्याच्या घटना माेठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाेलिसांनी आैद्याेगिक वसाहतीमध्ये गस्त वाढवून लुटमार करणाऱ्या टवाळखाेरांवर कारवाई करावी.- संदीप भाेजणे, सदस्य आरंभ ग्रुप

बातम्या आणखी आहेत...