आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वपूर्ण बदल:उत्पन्न मर्यादा आता 3.50 लाख, एनएमएमएस परीक्षेला यंदा वाढले 67 हजार विद्यार्थी

नाशिक / गणेश डेमसे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राष्ट्रीयस्तरावर एनएमएमएस (नॅशनल मेरिट कम मिन्स स्काॅलरशिप) ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी यंदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून आता परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा दीड लाखाहून साडेतीन लाख करण्यात आली आहे. उत्पन्न मर्यादा वाढल्याने यंदाच्या वर्षी या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही ६७ हजारांची वाढ झाली असून महाराष्ट्रातून तब्बल एक लाख ९७ हजार १६९ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केल्यानंतर १८ ऐवजी बुधवार, दि. २१ डिसेंबरला शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर होईल.

शासकीय, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमधील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. गेल्या वर्षी राज्यात एक लाख ३० हजार ५०४ विद्यार्थी प्रविष्ट होते. यंदा यात ६७ हजारांनी वाढ झाली असून १ लाख ९७ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी ५५०० विद्यार्थी प्रविष्ट होते. यंदा त्यात एक हजारांची वाढ झाली असून ६५०० परीक्षार्थी प्रविष्ट होतील.

ग्रामीण भागात कॉपीचे प्रकार, त्या केंद्रांवर कारवाईची मागणी: शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागात काही ठिकाणी काॅपीचे प्रकार घडत असल्याने अध्यापक भारतीचे राज्याध्यक्ष विनोद पानसरे यांनी शिक्षण उपसंचालक यांच्या माध्यमातून ही परीक्षा काॅपीमुक्त हाेण्यासाठी लक्ष देण्याची मागणी केली आहे.

चार वर्षे मिळणार शिष्यवृत्ती एनएमएमएस परीक्षेद्वारे शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववीपासून ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात होती. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

..अशी होईल परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार होईल. त्यातून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी पात्र ठरतील. राज्यातून ११ हजार ७६० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. या परीक्षेसाठी बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी अशा दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी ९० प्रश्नांसाठी ९० गुण असे एकूण १८० गुण असतील. मराठीसह इतर सात भाषांमध्ये परीक्षा होईल.

बातम्या आणखी आहेत...