आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानभरपाई शेतकऱ्याला देण्याचे आदेश:निकृष्ट प्लॅस्टिक कागदामुळे शेततळे रिते; कंपनीसह वितरकाला १० लाख दंड

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेततळे उभारण्यासाठी विकत घेतलेला प्लॅस्टिकचा कागद निकृष्ट दर्जाचा असल्याने शेततळ्यातील सर्व पाणी झिरपून गेल्याने १६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने याबाबत शेतकऱ्याने ग्राहक न्यायालयात दाद मागितली होती. याप्रकरणी ग्राहक न्याय मंचाने गुजरात क्राफ्ट इंडस्ट्रीज (गांधीनगर), न्यू पटेल टायर्स (लासलगाव) व एस.व्ही. एंटरप्रायजेस (पुणे) यांना १० लाख २३ हजारांची नुकसानभरपाई शेतकऱ्याला देण्याचे आदेश दिले.

ग्राहक न्याय मंचाने दिलेल्या निकालानुसार, महेश अोतूरकर (रा. निफाड) यांनी त्यांच्या शेतजमिनीत आंंबा, चिकू, डाळिंब, पेरूची झाडे लावली आहेत. तसेच ऊस, कांदे ही पिके ते घेतात. या पिकांसाठी गुजरातच्या कंपनीकडून एचडीपीइ जिअोमेम्बरेन हा शेततळ्यासाठी प्लॅस्टिक कागद चार लाख ६२ हजारांना विकत घेतला. तसेच कंपनीने शेततळे खोदून देत ९६ हजार रुपये मोबदला घेतला. अोतूरकर यांनी शेततळ्यात ४० हजारांचे पाणी विकत घेऊन तळे भरले. जुलैमध्ये पाण्याने भरलेला प्लॅस्टिक कागद फाटल्याने डिसेंबरमध्ये तळे रिते झाले. याविरोधात ग्राहक न्याय मंचात संबंधित कंपनीने कागद बदलून द्यावा अथवा नुकसानभरपाई द्यावी याकरिता आेतूरकर यांनी दाद मागितली होती. ग्राहक न्याय मंचाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद एेकून घेतला. यात कंपनी आणि वितरकांचा युक्तिवाद खोडून न्याय मंचाने संबंधित कंपनीला कागद बदलून द्यावा. हे शक्य नसल्यास शेतकऱ्याला १० लाख २३ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी असे आदेश दिले. अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य सचिन शिंपी, प्रेरणा काळुंखे यांनी हे आदेश दिले.

निकृष्ट कागदामुळे पिकांचे नुकसान
शेततळ्यात वापरण्यात आलेला कागद निकृष्ट दर्जाचा असल्याने सहा महिन्यांत फाटला. यामुळे विकत घेतलेले पाणी जमिनीत झिरपले. फळझाडांना पाणी मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्याला लाखोंचा तोटा सहन करावा लागला. शेतकरी नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे, असा निष्कर्ष न्याय मंचाने नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...