आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 75 नद्या अमृतवाहिनी करणार:जलबिरादरीतर्फे उप्रकम, गांधी जयंतीपासून श्रीगणेशा

प्रतिनिधी | नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रामध्ये गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा आणि पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी गांधी जयंतीपासून (ता. 2 ऑक्टोंबर) सुरवात होईल. यासाठी वर्धा येथील सेवाग्राममध्ये आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत 'चला जाणूया नदीला' महोत्सवाची सुरवात होणार आहे. जलबिरादरीतर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

महाराष्ट्र जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग यांनी सांगितले, उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील नंदिनी, कपिला, वरुणा, वालदेवी, अगस्ती व मोती या नद्यांचा समावेश आहे. आरोग्य सदृढ राखण्यासाठी नदीचे आरोग्य ठीक करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राज्यातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी जलबिरादरीतर्फे समाजाच्या सहभागातून 'चला जाणूया नदीला' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जलबिरादरीचे ब्रँड अ‌ॅम्बेसिडर अभिनेते चिन्मय उदगीरकर असतील.

75 नद्यांची यात्रा

नरेंद्र चुग यांनी सांगितले, राज्याला पूर आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी समाजाच्या सहभागाला पाठबळ देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सहकार्य करत आहेत. राज्यातील विविध नद्यांसाठी कार्यरत असलेले 110 जलनायक उपक्रमात सहभागी होणार आहेत. 15 ऑक्टोबर भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी राज्यातील 75 नद्यांवर एकाच दिवशी नदी यात्रेला सुरवात होईल. नदी अभ्यासक, नदी प्रेमी, शेतकरी, विद्यार्थी, नदीचे स्टेक होल्डर, सरकारी यंत्रणांमधील अधिकारी यांचा सहभाग राहील. प्रत्येक नदीच्या यात्रेवेळी किमान 100 जणांचा सहभाग राहील, असा प्रयत्न राहील.

स्वच्छतेसाठी आराखडा

चुग म्हणाले, नदी यात्रेवेळी सरकारी यंत्रणेचे अधिकारी आणि नदीशी निगडीत समाजाच्या सहभागातून सध्यस्थितीची माहिती संकलित केली जाईल. नद्यांच्या स्वच्छतेसाठी आधुनिक विज्ञानाची जोड देत आराखडा तयार केला जाईल. या आराखड्याची महाराष्ट्र सरकारचे सहकार्य आणि समाजाच्या सहभागातून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल. नदी महोत्सवासाठी मुंबईचे किशोर धारिया, प्रा. स्नेहल दोंदे, नाशिकचे राजेश पंडित, औरंगाबादचे रमाकांत कुलकर्णी, अनिकेत लोहिया, प्रमोद देशमुख, पुण्याचे विनोद बोधनकर, डाॅ. सुमंत पांडे, नागपूरचे प्रद्युम सहस्त्रभोजने, वर्धाचे माधव कोटस्थाने, सोलापूरचे डाॅ. श्रीनिवास वडकबाळकर प्रयत्नशील आहे.

बातम्या आणखी आहेत...