आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामांगीतुंगी येथे भगवान वृषभदेव 108 फूट मूर्ती महामस्तकाभिषेक महोत्सवाला आज पासून प्रारंभ झाला. हा महोत्सव 30 जून पर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवासाठी जैन बांधव देशाच्या विविध भागातून येत आहेत. बुधवारी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान वृषभदेव यांच्या मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्यात आला. सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कलशा विषयक झाला. या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी स्थानिक व बाहेरील शहरातून भाविक उपस्थित झाले आहेत.
जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान वृषभदेव यांचा नामगजर सुरू झाला आहे. मांगीतुंगी पर्वतावरील पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान वृषभदेव यांच्या 108 फूट उंच मूर्तीचा आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक सोहळा सुरू करण्यात आला. या भव्य मूर्तीचा महामस्तकाभिषेक सहा वर्षांनी करण्यात आला आहे. याआधी 28 फेब्रुवारी 2016 रोजी भगवान वृषभदेव यांचा पहिला महामस्तकाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. या भव्य मूर्तीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील भीलवाडा गावाजवळ मांगीतुंगी हा एक किल्ला आहे. येथे जैन तीर्थक्षेत्र आहे. जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंच मूर्ती येथे साकारण्यात आली आहे. या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि महामस्तकाभिषेक सोहळा 2016 मध्ये झाला होता.
मूर्ती उभारण्यासाठी प्रथम 120 फूट लांबीच्या कापडावर प्रस्तावित मूर्तीचे चित्र रेखाटण्यात आले आणि त्यानुसार ही मूर्ती घडविण्यात आली. त्यासाठी ग्रीक तत्त्वज्ञान पाली संस्कृतसह दहा भाषातील ग्रंथांचा अभ्यास करण्यात आल्याची माहिती आहे. ही भव्य मूर्ती अतिशय देखणी असून जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. त्यामुळे मांगीतुंगी जैन धर्मियांचे जागतिक तीर्थस्थळ होत आहे. अत्यंत टणक मानल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीच्या काळ्या पाषणात डोंगर कापून तयार केलेली ही मूर्ती अन्य मूर्तींच्या तुलनेत अधिक टिकाऊ मानली जात आहे.
अशी आहे मूर्ती
डोक्याचे केस 5 फूट, मुख 12 फूट, मान 4 फूट, कान 14 फूट, मान ते छाती 12 फूट, छाती ते नाभी 12 फूट, नाभी ते टोंगळे 36 फूट, टोंगळे चार फूट, टोंगळे ते पायाचा घोटा 29 फूट, तळपाय चार फूट, कमळ चार फूट, चौथरा तीन फूट
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.