आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण व आरोग्य विभागातील राज्याच्या सहसंचालक पदांवरील अधिकारी पेपरफुटी व भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटकेत असतानाच आणखी एक अधिकारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गजाआड झाला. नाशिकचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक अनिल मदन जाधव यांना तब्बल ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मुंबईच्या एसबी पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, जाधव यांच्या मुंबईतील राहत्या घरी एसीबीच्या पथकाने छापा टाकला असता त्यात सुमारे १ कोटी ६१ लाखांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली.
या प्रकरणात तक्रारदारानुसार, तक्रारदार हे टेंडर स्किल इंटरनॅशनल कॉस्मेटोलॉजी अॅकॅडमीमध्ये भागीदार असून त्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ येथे अॅकॅडमी व त्याअंतर्गत कोर्सच्या मंजुरीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक कार्यालयात अर्ज सादर केला होता. सहसंचालक जाधव याने अर्जात अनेक त्रुटी काढल्या. तक्रारदाराने संपूर्ण कागदपत्रे नव्याने सादर केली. अंतिम मंजुरीच्या मोबदल्यात जाधव याने तक्रारदाराकडे साडेपाच लाखांची मागणी केली. तक्रारदाराने एसीबीकडे ७ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार केली.
पडताळणीत १४ डिसेंबरला आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी सापळा रचून जाधव याला लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. खेरवाडी, वांद्रे येथील शासकीय तंत्र निकेतन परिसरातील कार्यालयात हा सापळा यशस्वी झाला. राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या प्रभारी संचालकपदाचा पदभार सहसंचालक अनिल जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
छाप्यात सापडले हे घबाड
घराच्या झडतीत ७९ लाख ४६ हजार ७४५ रुपये किमतीचे एक किलो ५७२ ग्रॅम सोन्याची नाणी, बिस्किटे व दागिने सापडले. ७९ लाख ६३ हजार ५०० एवढी बेहिशेबी रोख रक्कम मिळून आली. कार्यालय झडतीत २ लाख २८ हजार बेहिशेबी रोख रक्कम अशा एकूण १ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू व रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. सहाय्यक पोलिस आयुक्त आबासाहेब पाटील, निरीक्षक सुप्रिया नटे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रवीण लोखंडे, पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांनी अपर पोलिस आयुक्त लखमी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.