आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादायक:‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना आता थेट ‘पॉलिटेक्निक’च्या द्वितीय वर्षात प्रवेश

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीनंतर आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या कोणत्याही शाखेत थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकत्याच घेतलेल्या या निर्णयाचा फायदा आयटीआयच्या सुमारे आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांना होऊ शकेल. याद्वारे पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील जागाही भरण्यास मदत होऊ शकेल. यापूर्वी आयटीआयमध्ये ज्या ट्रेडचे शिक्षण घेतले जात होते, त्याच ट्रेडशी संबंधित शाखेतच विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश दिला जात होता. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मात्र ट्रेडच्या या बंधनातून आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांची मुक्तता झाली आहे. त्यामुळे काैशल्यधीष्ठित शिक्षणाला चालना मिळणार असून पदविका शिक्षणानंतर पदवी, उच्च शिक्षण असो की,नोकरी व व्यवसायाच्या संधीही सहज उपलब्ध होऊ शकतील. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक डिप्लोमा) या अभ्यासक्रमासाठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेला (ऑनलाइन) सुरुवात झाली आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया (ऑनलाइन पोर्टल ) सुरू झाली असून दहावीच्या निकालापूर्वी या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरून प्रक्रियेत सहभागी होता येईल. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया २ जूनपासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांना नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतिही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहे. दहावीच्या निकालानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे. या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे.

डिप्लोमानंतर डिग्रीच्याही थेट द्वितीय वर्षाला मिळतो प्रवेश यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदविका प्रवेशप्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेऊन आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळेल. दहावीनंतरच्या कोणत्याही ट्रेडमधून आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे. थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळाल्यानंतर डिप्लोमा पूर्ण करून या विद्यार्थ्यांना डिग्रीच्या अर्थात बी. ई.च्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जातो.

^पॉलिटेक्निक डिप्लोमानंतर नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत असतात. तसेच पदवीच्या थेट द्वितीय वर्षालाही प्रवेश मिळत असतो. दहावीनंतर अनेक विद्यार्थी आयटीआय करतात. या निर्णयामुळे आता आयटीआय झालेले विद्यार्थीही तंत्रशिक्षणाला प्रवेश घेऊन डिप्लोमा किंवा डिग्रीचे उच्च शिक्षण घेऊ शकतील. - प्रा. ज्ञानदेव नाठे, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, नाशिक

बातम्या आणखी आहेत...