आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नर:मंत्र्यांची जनआशीर्वाद तर पोलिस अधिकाऱ्यांची स्वयंगौरव यात्रा! कोरोना नियमांची धि॑ड काढत निरोपाची मिरवणूक

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्याची रुग्णसंख्या हजाराच्या घरात आणि ग्रामीण भाग शहरापेक्षा आघाडीवर आहे. निफाड तालुक्यात ७८ तर सिन्नर तालुक्यात १२९ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना नियम पाळण्याच्या सूचना आणि तिसऱ्या लाटेचा इशारा मुख्यमंत्री तळमळीने देत आहेत. मात्र जनता नियमांचे पालन करते की नाही हे पाहण्याची जबाबदारी असलेल्या ग्रामीण पोलिस दलात हेच नियम पायदळी तुडविण्याची जणू स्पर्धा लागली आहे.

सटाणा येथे बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्याला सवाद्य मिरवणुकीने निरोप देण्याचा सोहळा पार पडल्यानंतर त्यापासून प्रेरणा घेत सायखेडा येथेही बदली झालेले सहा. पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ व उपनिरीक्षक तांबे यांचा शुक्रवारी वाजतगाजत निरोप समारंभ साजरा झाला. सजवलेल्या उघड्या मोटारीत बसवून या दोन अधिकाऱ्यांवर फुले उधळत दणक्यात मिरवणूक झाली. चाहत्यांनी अधिकाऱ्यांच्या शिरावर टोपी -टॉवेल शाल पांघरत त्यांचे गोडवे गायले. एकीकडे बिना वाजंत्री, बिना मिरवणूक आणि इन मिन उपस्थितीत लग्न सोहळे उरकण्याचा बा॑का प्रसंग जनतेवर आला असताना पोलिसांनी नियम धाब्यावर बसवून मिरवणूक काढल्याचा संताप जनतेला न आला तरच नवल!

सामान्यांनी नियम मोडले तर त्यांच्यावर काठी उगारण्याचा अधिकार असलेले पोलिसच नियम मोडू लागले तर त्यांच्यावर काठी उगारणारे कोणीच नाही. त्यामुळे पोलिस कसेही वागले तरी सगळे काही माफ असते, असा जनतेचा गैरसमज होऊ लागला आहे. पोलिसांनी मिरवणूक काढली मग आपणही तेच केले तर काय बिघडते असाही जनतेचा समज आणि त्यातून कोरोनाचा प्रसार वाढल्यास जबाबदार कायद्याचे रक्षक की सामान्य जनता..?

नियम तोडण्यात राजकीय नेत्यांची आघाडी
अत्यल्प उपस्थितीत लग्न समारंभ करण्याचा नियम असताना जवळपास सर्वच राजकीय पक्षांतील नेते,आमदार, मंत्री व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबातले विवाह शेकडोंच्या उपस्थितीत नियम पायदळी तुडवून केल्याची अनेक उदाहरणे राज्यात पाहावयास मिळाली. त्याचप्रमाणे जनतेला नियमांचे धडे देणाऱ्या नेत्यांच्या विविध कार्यक्रमांत याच नियमांचा सर्रास बट्ट्याबोळ होत असल्याच्या घटनाही प्रसार माध्यमातून अनेकदा झळकल्या. सध्या तर केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा राज्यात सुरू आहे. त्यातही कोरोना नियमांची पुरेपूर पायमल्ली चालू आहे. राजकीय नेत्यांच्या याच घोडचुकांची प्रेरणा सटाणा व सायखेड्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आता जनतेने नियम मोडल्यास त्यांच्यावर दंडुका उगारण्याचा नैतिक अधिकार पोलिस खात्याला आहे की नाही, याचे उत्तर सटाणा व सायखेडा येथील घटनांवर वरिष्ठ काय कारवाई करणार यातूनच मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...