आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अभियांत्रिकी'साठी जानेवारी - एप्रिलमध्ये जेईई मेन परीक्षा:मराठीसह 13 भाषांत पेपर; 12 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी), एनआयटी या संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉईंट एंट्रन्‍स एक्‍झाम या जेईई मेनच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही परीक्षा जानेवारी व एप्रिल 2023 मध्ये परीक्षा होणार आहे. पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. मराठीसह एकूण 13 भाषांमध्ये ही परीक्षा होईल.

एनटीएतर्फे राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सीईटी परीक्षांचे आयोजन केले जाते. बी. ई.,बी. टेक, बी. आर्क, व बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमांसाठी जेईई मेन 2023 या परीक्षेच्या दोन संधी राहणार असून पहिल्या सत्राची परीक्षा 24 ते 31 जानेवारी या दरम्यान होईल. तर 2 ते 12 एप्रिल या दरम्यान दुसऱ्या सत्राची परीक्षा होईल. संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) असलेल्‍या या परीक्षेच्‍या रचनेचाही तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे. नाशिकमध्ये 20 ते 25 केंद्रांवर सुमारे दहा हजारांहून अधिक परीक्षार्थी प्रविष्ठ होत असतात.

अशी होईल परीक्षा

जेईई मेन परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार असून बहुपर्यायी वस्‍तूनिष्ठ स्‍वरुपाचे प्रश्‍न या प्रवेश परीक्षेत विचारले जातील. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटीक्स या तीन विषयांवर आधारित 90 प्रश्न 300 गुणांसाठी असतील. ए व बी अशा दोन विभागात परीक्षेचे स्वरुप असेल. ए विभाग हा बहुपर्यायी स्वरुपाचे प्रश्नांचा असेल तर बी विभागात दहा पैकी पाच प्रश्न सोडवावे लागेल. दोन्ही विभागातील प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धती लागू असेल. बी.ई व बी.टेक साठी तीन तासांचा वेळ व बी. आर्क व बी. प्लॅनिंगच्या पेपरसाठी 3 तास 30 मिनिटांचा वेळ असेल. इंग्रजीसह हिंदी, मराठी, कन्नड, बंगाली, मल्‍याळम, पंजाबी, ओडीया, तमिळ, तेलगू, उर्दू, गुजराती, आसामी या भाषांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. जेईई मेन परीक्षेतून पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यात जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा घेतली जाणार आहे.

12 जानेवारीपर्यंत अर्जाची संधी

24 ते 31 जानेवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी 15 डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली. 12 जानेवारी 2023 पर्यंत विद्यार्थ्यांना https://jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. तर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात हाॅल तिकीट उपलब्ध होईल. दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी 7 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधित अर्ज करता येईल.

बातम्या आणखी आहेत...