आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डी. बी. स्टार लक्षवेधी:आराेग्य संवर्धनाचे प्रमुख केंद्र असलेले शहरातील जाॅगिंग ट्रॅकच बनले आराेग्य बिघडविण्याचे स्पाॅट

जहीर शेख | नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंडी वाढताच आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने व्यायामप्रेमींसह खेळाडू, तरुण, ज्येष्ठ नागरिकांची जाॅगिंग ट्रॅकवर गर्दी वाढू लागली आहे. शहरातील जाॅगिंग ट्रॅकवर पहाटे ते रात्री उशिरापर्यंत तेेथे जाॅगर्सची गर्दी असते.

अशा स्थितीत महापालिका प्रशासनाने जाॅगिंग ट्रॅकच्या नियमित देखभाल-स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे असताना पालिकेकडून ट्रॅकच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आले आहे. अस्वच्छता व दुर्गंधीच्या विळख्यात अनेक जाॅगिंग ट्रॅक असताना पालिकेचे कर्मचारी मात्र या ठिकाणी फिरकतही नसल्याची तक्रार नागरिकांकडून ‘डी. बी. स्टार’कडे करण्यात आली. ट्रॅकच्या दुरवस्थेवर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत...

थंडीचा जोर वाढल्याने शहरातील जाॅगिंग ट्रॅकवर व्यायामप्रेमींची गर्दी वाढत आहे. शहरातील राजमाता जिजाऊ क्रीडानगरी येथे जॉगिंग ट्रॅक, गोल्फ क्लब, कृषीनगर, इंदिरानगर जाॅगिंग ट्रॅकवरही आराेग्यसाधनेसाठी नागरिकांची माेठी गर्दी दिसून येते. मात्र, पालिका प्रशासनाकडून या ठिकाणी याेग्य नियमित देखभाल, स्वच्छता केली जात नसल्याने जाॅगर्स, व्यायामप्रेमींच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

अनेक ठिकाणी जाॅगिंग ट्रॅकवर अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, दिवे, रेडिऒ बंद असणे यांसह विविध समस्यांना जाॅगर्सना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी टवाळखाेर, मद्यपींचाही सुळसुळाट वाढल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नुकताच नवीन झालेला गोल्फ क्लब मैदानावरील ट्रॅक सुस्थितीत असला, तरी शहरातील उर्वरित ठिकाणचे ट्रॅक दुर्लक्षितच असल्याचे चित्र आहे.

जाॅगर्सना पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, नियमित स्वच्छता हाेणे, अनेक दिवे बंद असणे यामुळे माेठ्या संख्येने या ठिकाणी जाॅगर्सची गैरसाेय हाेत असल्याच्याही तक्रारी वाढत आहेत. ट्रॅकवर पडणारा झाडांचा पालापाचोळा वेळाेवेळी उचललाच जात नसल्याने अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आले आहे. परिणामी अनेक ठिकाणी जाॅगर्सना धुळीचा, तसेच दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे.

यासंदर्भात जाॅगर्सकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. तसेच, शहरातील अनेक जाॅगिंग ट्रॅकवर रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी असते. यात महिलांचीही संख्या माेठी असते. मात्र, अनेक ट्रॅकवर दिवे बंदच असतात, तर अनेक ठिकाणी टवाळखाेरांचा उपद्रव असताे. अशा परिस्थितीत महिला जाॅगर्सच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासनाने सुरक्षारक्षक नेमण्याची मागणीही जॉगर्सकडून केली जात आहे.

गोल्फ क्लबवर अस्वच्छताच : शहरातील गोल्फ क्लब मैदान परिसरात सर्वाधिक जाॅगर्स हजेरी लावतात. या ठिकाणी ट्रॅक सुस्थितीत असला, तरी नियमित स्वच्छता हाेत नसल्याची तक्रार काही जॉगर्सकडून डी. बी. स्टारकडे करण्यात आली. झाडांचा पालापाचोळा, प्लॅस्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या यांमुळे अस्वच्छतेचे दर्शन घडत आहे. परिसरात प्रेमीयुगुलांसह टवाळखाेरांचाही वावर वाढल्याच्या तक्रारी आहेत.

शरणपूरराेडवरील ट्रॅकही समस्याग्रस्त
शहरातील शरणपूररोड येथे कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या नावाने उभारण्यात आलेला जाॅगिंग ट्रॅकही समस्येच्या गर्तेत सापडला आहे. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या आकर्षक दिव्यांची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी अस्वच्छता वाढली असून दुर्गंधीही पसरली आहे. रात्रीच्या वेळी टवाळखोरांचा वावर असताे.

टवाळखाेरांकडून ओल्या पार्ट्या
काही ट्रॅकचा परिसरच अंधारात हरविलेला असल्यामुळे टवाळखोर, मद्यपी, भुरट्या चोरांचा येथे ठिय्या असतो. ओल्या पार्ट्या मद्यपींकडून रंगविल्या जातात. मात्र गस्तीवरील पोलिसांचे वाहन केवळ सरळ रस्त्याने मार्गस्थ होऊन प्रेमीयुगुलांचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असतात. पोलिस बीट मार्शलदेखील अनेकदा या ट्रॅकवर रात्री विश्रांतीसाठी येतात.

गामणे मैदान जॉगिंग ट्रॅक झाला असुविधांचा ट्रॅक
प्रभाग क्रमांक ३१ मधील वासननगर येथे असलेल्या जागेवरील गामणे क्रीडांगणाची दैना झाली असून मैदानासह येथील स्वच्छतागृहआणि जॉगिंगदेखील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. स्वच्छतागृहाची दुरवस्था झालेली असून याकडे मनपाचे दुर्लक्षच आहे.

जॉगिंग ट्रॅक नव्हे, पार्किंग स्पाॅट
इंदिरानगरनजीकच्या साईनाथनगर ते डीजीपीनगर यासह परिसरातील युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक सकाळी फेरफटका मारण्यासाठी जाॅगिंग ट्रॅकवर येतात. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर नेहमीच वर्दळ असते. परंतु बहुतेक नागरिक सर्रासपणे जॉगिंग ट्रॅकमध्येच चारचाकी आणि दुचाकी लावतात, त्यामुळे जॉगिंग ट्रॅक सध्या पार्किंग स्पॉट झाला आहे.

जॉगिंग ट्रॅकवरच ‘स्मोकर्स झोन’
शहरातील या महत्त्वाच्या जॉगिंग ट्रॅकवर महाविद्यालयीन तरुण धूम्रपान करतात. गोल्फ क्लब, कृषीनगर, इंदिरानगर जाॅगिंग ट्रॅकवरही तरुण धूम्रपान करताना दिसून आले. त्यामुळे आराेग्यसाधनेसाठी जॉगिंग ट्रॅकवर येणाऱ्यांना शुद्ध हवेऐवजी दूषित वातावरणास सामाेरे जावे लागते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याेग्य पावले उचलावीत.

बातम्या आणखी आहेत...