आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांतील संशोधन आणि नवीन कल्पनांना चालना देणाऱ्या आविष्कार स्पर्धेचे यंदा पुन्हा आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे काॅलेज बंद असल्याने ही स्पर्धा झाली नाही. यंदा होणाऱ्या संशोधनपर आविष्कार स्पर्धेत राज्यातील सर्व विद्यापीठांतील निवड झालेले विद्यार्थी आपले प्रकल्प सादर करणार आहेत. विशेष म्हणजे आविष्कारमधूनच अनेक यशस्वी स्टार्टअपही उदयास आले आहेत. स्टार्टअप ते यशस्वी उद्योजक असा प्रवास घडवणाऱ्या या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमधील प्रयोगशीलतेला चालना मिळत असते, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित राज्यस्तरीय आविष्कार आयोजन समितीचे अध्यक्ष तथा टी. जे. काॅलेजचे प्राचार्य डाॅ. संजय चाकणे यांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केले.
प्रश्न : या स्पर्धेतून संशोधनाला कशा पद्धतीने चालना मिळते? उत्तर : पारंपरिक शाखा असो की व्यावसायिक, शिक्षणामधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वेगवेगळे प्रकल्प सादर करावे लागतात. विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या माध्यमातून तयार केलेल्या या प्रकल्पांना व्यासपीठ मिळावे तसेच त्यांना पुढे जाऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून स्टार्टअप सुरू करता यावा या उद्देशाने तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या प्रयत्नातून २००६ पासून राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा सुरू झाली.
प्रश्न : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मान मिळाला, त्यादृष्टीने काय नियोजन केलेे? उत्तर : कोरोनामुळे गेली दोन वर्षे आविष्कार स्पर्धेचे आयोजन झाले नाही. यंदाच्या वर्षी राज्यभरातील सर्व विद्यापीठांमध्ये मोठ्या उत्साहाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धा भरवण्याचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला असून नवीन वर्षात म्हणजेच १९ ते २७ जानेवारी २०२३ यादरम्यान पुणे विद्यापीठाच्या आवारात ही स्पर्धा होईल. स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू असून वेगवेगळ्या समित्यांची स्थापना केली आहे.
प्रश्न : कोणत्या विषयांवर आणि सर्व विद्यापीठांतील किती प्रकल्प यंदा सहभागी होतील? उत्तर : मानवता, भाषा आणि कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधे आणि फार्मसी अशा वेगवेगळ्या विभागांतून पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएचडी आणि प्राध्यापक संशोधन प्रकल्प सादर करतात. आविष्कार स्पर्धा सुरुवातीला महाविद्यालय स्तरावर, त्यानंतर विभागीय आणि आता विद्यापीठ स्तरावर होते. विद्यापीठ स्तरावरून निवड झालेले विद्यार्थी पुढे आविष्कार स्पर्धेत सहभागी होतील. यंदा राज्यातील २२ विद्यापीठांतून १४०० विद्यार्थी आपले संशोधनपर प्रकल्प सादर करतील.
प्रश्न : राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे कोणत्या संधी असतात? उत्तर : या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकासोबतच शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच विजयी ठरलेले विद्यार्थी व त्यांचे प्रकल्प पुढे राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या अन्वेषण स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांचे अभिनव प्रकल्पांना पेटंट मिळवून देण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.