आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुस्लिम समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू सुफी संत हजरत शेख अब्दुल कादिर जिलानी ऊर्फ गौस-ए-आझम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जुने नाशिक परिसरासह वडाळागावातून ‘जुलूस-ए-गौसिया’ मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. जुने नाशिकमधून शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. चौक मंडई येथून दुपारी चार वाजता मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी खतिब ए शहर यांनी देशाच्या प्रगती व कल्याणासाठी तसेच शांतता व एकात्मता जोपासली जावी, याकरिता प्रार्थना केली.
यावेळी उपस्थितांनी ‘आमिन’ म्हणत त्यांच्या प्रार्थनेला पाठिंबा दिला. मदरसा गौस-ए-आझम, मदरसा सादिकुल उलूमचे विद्यार्थी पारंपरिक पोशाखात सहभागी होऊन शिस्तबद्ध संचलन करीत होते. प्रत्येक मंडळांच्या कार्यकर्त्याकडून दरूदोसलाम व गौस-ए-आझम यांच्यावर आधारित स्तुतिपर काव्य म्हटले जात होते. अग्रभागी सजविलेल्या जीपमध्ये खतीब मिरवणुकीचे नेतृत्व करीत होते. त्यांच्यासोबत नाऐब शहर-ए-काझी सय्यद एजाज काझी, हाजी झाकीर, मौलाना शाकीर रझा होते. तसेच गौस ए आझम यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती उलेमा देत होते. मिरवणूक चौक मंडई, बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, आझाद चौक, चव्हाटा, बुधवार पेठ, काजीपुरा, कोकणीपुरा, खडकाळीवरून शहीद अब्दुल हमीद चौकातून मार्गस्थ होत बडी दर्गाच्या प्रांगणात पोहाेचली. या ठिकाणी धर्मगुरूंनी प्रवचन दिले. फातिहा व दरूदोसलामचे पठण करून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. दरम्यान, पूर्वसंध्येला मुस्लिम बांधवांनी घरांमध्ये विशेष ‘मलिदा’ हे खाद्यपदार्थ तयार करून फातिहा पठण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.