आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद आता राज्यात अनेक ठिकाणी उमटताना दिसत आहेत. नाशिकमध्ये कर्नाटक बँकेच्या नावाला काळे फासण्यात आले आहे.
अथवा आरे ला कारे
बेळगावमध्ये कन्नड संघटनांनी महाराष्ट्रातील वाहनांवर केलेल्या दगडफेकीचा निषेध करत स्वराज्य संघटनेतर्फे आज आक्रमक आंदोलन करण्यात आले. स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटका बँकेच्या फलकाला काळे फासले. यावेळी आंदोलकांनी कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कर्नाटक सरकारने त्यांच्या औकातीत राहावे, अथवा आरे ला कारे करू, असा इशारा स्वराज्य संघटनेतर्फे देण्यात आला. यावेळी कर्नाटक सरकार मुर्दाबाद, कर्नाटकी मुख्यमंत्री तुमचे करायचं काय खाली डोके वरती पाय, अशा घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
कर्नाटकात घुसणार
छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी भूमिका स्वराज्य संघटनेने घेतली आहे. संघटनेने मागणी केली की, रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक जातात, त्यांची सुरक्षा सरकारने करावी. अन्यथा वेळप्रसंगी स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते कर्नाटकात जाणार. तसेच, महाराष्ट्राची अस्मिता जपणं हे प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाचे कर्तव्य आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन कर्नाटकी सरकारला धडा शिकवला पाहिजे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर जर कोणी घाला घालीत असेल तर यानंतर त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संघटनेने दिला.
महाराष्ट्रात गाडी येऊ देणार नाही
कर्नाटकी संघटनांना वाटत असेल की महाराष्ट्रातील गाड्या फोडून आम्ही फार मोठे तीर मारले तर त्यांना स्वराज्य संघटनेच्या वतीने आम्ही इशारा देतो यापुढे एक सुद्धा कर्नाटकची गाडी महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.
आमचा राग चारपट जास्त
आंदोलक म्हणाले की, मराठी माणसावर हल्ले होत राहिल्यास महाराष्ट्रात कर्नाटकी माणसांना धंदे व्यवसाय करू देणार नाही. तुम्हाला आमच्या लोकांच्या बद्दल एवढी चीड असेल तर आम्हालाही तुमच्या चारपट चिड येते हेही विसरू नका. आम्ही छत्रपतींचे विचार, छत्रपतींचे संस्कार आत्मसात करत असल्याने आतापर्यंत शांत होतो. परंतु आता यापुढे कर्नाटकी सरकारचे काही ऐकून घेतले जाणार नाही.
आंदोलनात स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर, निमंत्रक आशिष हिरे, प्रमोद जाधव, सुभाष गायकर, भारत पिंगळे, सागर जाधव, वैभव दळवी, शुभम देशमुख, दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कोतकर, किरण डोके, अर्जुन पाटील, संजय तुपलोंढे आदीसह स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.