आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशब्दातून लिहीलेल्या कल्पना, भावना, कविता जेव्हा रंग रेषांमधून उमटतात तेव्हा त्या जिवंत होऊ लागतात. काही कविता बोलू लागतात. आज रसिकांनी ही अनुभूती घेतली काव्य नक्षत्र मालेत.
वर्धा येथे सुरू असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुस-या दिवशी स्वर्गीय मनोहर म्हैसाळकर स्मृती काव्य नक्षत्रमालेत बालचित्रकारांनी ही नक्षत्रमाला साकारली. यात विविध कविंच्या कविता दृश्यरुपात प्रकट झाल्या.
काव्यनक्षत्रमाला या दृश्यचित्र प्रकल्पाचे उदघाटन मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बसोलीचे चंद्रकांत चन्ने व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
विदर्भातील कवींची निवड
या उपक्रमात विदर्भातील ३० निवडक कवींच्या कविता निवडण्यात आल्या होत्या. कवी सुरेश भट, कवी ग्रेस, ना. घ. देशपांडे, विठ्ठल वाघ, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कवी अनिल, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, राम शेवाळकर आणि प्रफुल्ल शिलेदार, संजय तिगावकर आदींच्या कवितांचा समावेश होता. बसोलीच्या १५० बालचित्रकारांनी ३० वेगवेगळ्या कॅनव्हासवर सामूहिकपणे या कवितांचे दृश्य स्वरूप रसिकांसमोर रंग आणि रेषेच्या माध्यमातून सादर केले.
अनोख्या प्रयोगाला रसिकांची दाद
ही बालचित्रकार मंडळी विदर्भातील विविध शाळेतील बसोलीचे सदस्य असून ५ ते ९ या वर्गातील होती. प्रत्येक गटाला "नक्षत्र आणि तारे" यांची नावे देण्यात आली आहे. ४ x ४ च्या मोठ्या कॅनव्हासवर अॅक्रीलिक रंगमाध्यामातून हे कविताचित्र साकारण्यात आले.
साहित्य समेंलनातील या आगळ्या वेगल्या प्रयोगाला उपस्थितांनी भरभररून दाद दिली. हा वेगळा उपक्रम यापुढेही होणाऱ्या संमेलनात घ्यायला हवा, तो विद्यार्थ्यांवर खरा संस्कार ठरेल, अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थित रसिकांनी दिल्या. या संमेलनात चिमुकल्यानींही अनेक कविता समजून घेत त्या रंग, रेषेतून उमटवल्या. टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक करण्यात येत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.