आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘खाकी’ देवदूत; गंभीर जखमींचा वाचवला जीव

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्राणघातक हल्ल्यातील दोन गंभीर जखमींना तत्काळ केले रुग्णालयात दाखल

खून अथवा प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांचे पहिले काम असते ते हल्लेखोरांचा शोध घेणे, मात्र यास अपवाद ठरले आहेत नाशिक शहर पोलिस. पंचवटीतील दोन आणि म्हसरुळमधील एका गुन्ह्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला पोलिसांनी गोल्डन अवर्समध्ये उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत त्यांचा जीव वाचवला. या रुग्णाला सेवाभावी संस्थांकडून आर्थिक मदत मिळवून देत कुटुंबियांना मदत करत ‘खाकी’ खऱ्या अर्थाने देवदूत ठरली आहे.

पोलिस दल हे सर्वाधिक टीका होणारे खाते आहे. मात्र खाकीमध्येही माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती शहर पोलिसांनी दिली. ४ जूनला पंचवटीच्या विजयनगरात व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये न विचारता नाव समाविष्ट केल्याच्या रागातून तीन अल्पवयीन मुलांनी दीपक डावरे या तरुणावर कोयत्याने वार केले होते. डावरे जीवन-मरणाच्या दारात असताना पोलिसांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. १० दिवस त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. शनिवारी त्याला डिस्चार्ज मिळाला.

विशेष म्हणजे या तरुणाला वडील नाही, तो विधवा आईचा एकुलता एक मुलगा आहे. पेठरोड येथील तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. पोलिसांनी खासगी रुग्णालयात दाखल करत त्याचे प्राण वाचवले. म्हसरुळला ७ जूनला आरोपी राजू ठाकूर याने पत्नी चंदा (४५) हिचा गळा चिरला व स्वत: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. यातील जखमी महिलेला पोलिसांनी खासगी रुग्णालयात दाखल केल्याने तिचा जीव वाचला. उपआयुक्त अमोल तांबे, वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी पाठपुरावा केला. पोलिसांची जखमींना वाचवण्याची धावपळ बघून रुग्णालय प्रशासनही भावूक झाले.

पोलिसांच्या मदतीमुळेच माझा मुलगा मृत्यूच्या दाढेतून परत आला
किरकोळ कारणावरून मुलाच्या पोटात कोयता मारून गंभीर जखमी केले होते. मुलगा वाचेल की नाही याची शाश्वती नव्हती. पोलिसांनी मुलाला वेळीच उपचार मिळवून दिले. आर्थिक मदतही केली. पोलिसांमुळे माझा मुलगा जिवंत आहे. पोलिसांच्या उपकाराची परतफेड या जन्मात करणे शक्य नाही. - श्रीमती डावरे, जखमीची आई

आईविना राहू शकलो नसतो
वडिलांनी आईचा गळा चिरून तिचा खून करण्याचा प्रयत्न करत आत्महत्या केली. पोलिसांनी आईला वेळीच खासगी रुग्णालयात दाखल करत जीव वाचवला. उपचार करण्याची परिस्थिती नव्हती. पोलिसांनी मदत मिळवून दिल्याने आई वाचली.
- जखमी महिलेचा मुलगा

बातम्या आणखी आहेत...