आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैभवशाली संस्कृती अशी खान्देशची ओळख आहे. हीच संस्कृती जपण्यासाठी दरवर्षी खान्देश महोत्सवाचे आयोजन केले जाते. याहीवर्षी हा महोत्सव आयोजित केला असून नाशिककरांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे. याबाबतची माहिती आमदार सीमा हिरे, रश्मी बेंडाळे-हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील अन्य भागांच्या तुलनेने खान्देशी सांस्कृतिक, सामाजिक अशी स्वतंत्र ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील काही भाग जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे खान्देश म्हणून ओळखले जातात. या भागाची कृषी संस्कृती, खाद्य संस्कृती वेगळी आहे.
येथे प्राचीन परंपरा आजही जोपासली जात असून या भागातील अनेक दिग्गजांनी साहित्य, कला, शैक्षणिक, संशोधन, समाजकारण यांसारख्या विविध क्षेत्रांत आपले अनमोल योगदान दिले आहे. म्हणून तेथील संस्कृती, कला, साहित्य, खाद्यपदार्थ याबरोबरच येथील माणसांनी जोपासलेल्या सांस्कृतिक वैभवास व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खान्देश महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आमदार हिरे यांनी सांगितले.
..असा आहे महोत्सव
दिनांक २२ ते २५ डिसेंबर रोजी ठक्कर डोम, सिटी सेंटर मॉलजवळ हा उत्सव होणार आहे. २२ डिसेंबर रोजी सिडको भागातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेमध्ये कानूबाई उत्सव गोंधळी, नृत्य, लेझीम पथक, डोंगरदेव तसेच खान्देशी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिकृती, विविध वेशभूषा केलेले शालेय विद्यार्थी यांसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही शोभायात्रा निघणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.