आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहस:गुडघ्याएवढ्या बर्फात उणे सात अंश तापमानात जमिनीचा सर्व्हे, लेह-लडाख सीमा, जमिनीची पाहणी  केवळ ८ महिन्यांत पूर्ण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • {चमूने प्राणाची जोखीम पत्करून आव्हान पेलले

जमिनीपासून दहा हजार फूट उंची असलेला प्रदेश. त्यात पारा उणे ७ अंशांवर. अंगावर २० ते २५ किलो वजन, गुडघाभर बर्फातून वाट काढताना संतुलन मुळीच बिघडू दिले नाही. अशाच निसर्गाच्या अनेक आव्हानांना तोंड देत लेह-लडाख सीमेवरील भूमी सर्वेक्षणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यासाठी संरक्षण विभागाच्या भूमी सर्वेक्षण टीमने प्राणाची जोखीम पत्करून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. हे काम पूर्ण करण्यासाठी अनेक महिने निघून जातील असे वाटले. पण प्रत्यक्षात केवळ आठ महिन्यांत ते पूर्ण करण्यात आले. कठीण परिस्थितीत ते पूर्ण केल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी टीमचा गौरवही केला. नाशिकचे प्रणवदेखील या चमूत होते. आव्हानांचा थरार त्यांच्याच शब्दांत ...

पावलापावलावर संघर्ष ... हेलिकॉप्टरने भोजनव्यवस्था केली जायची, त्यावरच दोन-तीन दिवस भागवावे लागायचे..
‘बर्फाळ भागात उणे ७-८ तापमान..क्षेत्रफळाची मोजणी करताना निशाण शोधताना खूप कसोटी लागते. तासन््तास निघून जातात. काही ठिकाणी रस्ता किंवा कच्चा रस्ताही नाही. बर्फ, दगड, माती, काटेरी झुडपे. मार्ग शोधणे व खुणा निश्चित करणे अतिशय कठीण होते. कधी-कधी दिवस निघून जातो. पण एक बिंदूदेखील सापडत नाही. आम्हाला उपकरणे आणि नकाशे सोबत घेऊन प्रवास करावा लागतो. दहा किलो वजन तर कपड्यांचेच होते. २० ते ३० किलोंची सामग्री, ट्रायपॉड यंत्र तसेच नकाशेही सोबत बाळगावे लागतात. हा भारत व पाकिस्तानच्या सीमेजवळील भाग आहे. त्यामुळे नेहमीच दहशतवाद्यांच्या घुसखोरीची चिंता असते. अशा परिस्थितीत लष्कराचे सैनिक व हेलिकॉप्टरने आम्हाला मदत मिळत होती. लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर सरकारने भूमी सर्वेक्षण करून त्याचे नकाशे, महसूल वही बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याची जबाबदारी आमच्या टीमला दिली. या भागात राहणेदेखील कमी आव्हानाचे नाही. जोरदार बर्फवृष्टीमुळे घराबाहेर पडणेही कठीण होते. वाहतूक ठप्प असते. पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा होतो. पाणी प्यायचे झाल्यास बर्फ वितळावा लागतो. भोजन, भाज्या, फळे मिळण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे लष्कर अन्नाचा साठा करून ठेवते. कधी-कधी आम्हाला हेलिकॉप्टरने भोजन पाठवले जात होते. आम्ही त्याच्या बळावर दोन ते तीन दिवस काढायचो. टीमने दीड वर्षाचे हे काम केवळ आठ महिन्यांत पूर्ण केले. या काळात ११०० एकर जमिनीचे रेखांकन, ड्रॉइंग इत्यादीचा दस्तऐवज तयार केला.’ - प्रणव
(नीलेश अमृतकर यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित)

बातम्या आणखी आहेत...