आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्स्पाेज:कांदा लिलावात महिला संस्था सहभागी होताच लासलगावी व्यापाऱ्यांचा बहिष्कार

लासलगाव / नीलेश देसाई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संघटनेचे कारण पुढे करून बाजार समितीतील गलिच्छ प्रकार

आशिया खंडातील सर्वात नावाजलेली बाजारपेठ म्हणून अभिमानाने नावलौकिक सांगणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची मान शरमेने खाली गेली आहे. विशेष म्हणजे सभापतिपदी महिला असलेल्या या बाजार समितीत एका महिला संस्थेने लिलावात उतरून कांदा खरेदीची सुरुवात करताच स्थानिक व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार घातला. कृषीसाधना महिला सहकारी संस्थेच्या संचालिका, नवी दिल्ली येथील इफको संस्थेच्या पहिल्या महिला संचालिका आणि विंचूर विकास सोसायटीच्या अध्यक्ष असलेल्या साधना जाधव यांना नाफेडच्या वतीने कांदा खरेदीचे टेंडर मिळूनही लासलगावच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी पुरुषी मानसिकता आणि व्यापारी मक्तेदारीचे गलिच्छ दर्शन घडवले. बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही यावेळी बोटचेपी भूमिका घेत व्यापाऱ्यांना शरण जाणे पसंत केले.

लासलगाव बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या या मक्तेदारीचा हा पहिला प्रसंग नाही. कांदा खरेदीचा परवाना बाजार समिती देते, मात्र नवीन व्यापारी असोसिएशनचा सभासद नसल्याचे घटनाबाह्य कारण पुढे करून त्यांना लिलावात सहभागी होऊ दिले जात नसल्याचे चित्र दिसते. याचा फटका कृषी साधना शेतीमाल उत्पादक महिला सहकारी संस्थेला गुरुवारी बसला. या संस्थेला नाफेडच्या वतीने कांदा खरेदीचे काम मिळाले आहे. कांदा खरेदी-विक्रीचा परवानाही संस्थेकडे आहे. विंचूर बाजार समितीत ही संस्था कांदा खरेदी करते, मात्र लासलगाव बाजार समितीच्या लिलावात ही महिला संस्था सहभागी होताच अन्य व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडला. ही संस्था लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनची सभासद नसल्याचे कारण देण्यात आले, मात्र असोसीएशनचे सभासद असलेल्यांना लिलावात सहभागी होता येईल, असा कोणताही नियम नसल्याने यामागे लासलगावच्या व्यापाऱ्यांची “पुरुषी’ मनोवृत्तीच पुढे आली.

दरम्यान, कांदा लिलाव बंद पडल्यानंतर व्यापारी असोशियनचे पदाधिकारी व बाजार समिती सभापती, संचालक, सचिव यांची बाजार समिती आवारात बैठक झाली. कृषीसाधना या संस्थेस नाफेडतर्फे खरेदीचे लेखी पुरावा सादर करण्यास सांगण्यात आले व स्थानिक असोसिएशनचे सदस्य नसल्याचे कारण पुढे करून लिलावात सहभागी होण्यापासून मज्जाव करण्यात आला. विशेष म्हणजे, परवानाधारक महिला संस्थेला संरक्षण देण्याऐवजी बाजार समितीच्या महिला सभापतींनीही पदाधिकाऱ्यांपुढे झुकती भूमिका घेत, संबंधित संस्थेला लिलावात सहभागी होण्यापासून रोखले.

मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी सभासदत्वाचे कारण
मॉडेल अॅक्ट लागू झाल्यानंतर देशातील कोणताही व्यापारी कोणत्याही बाजार समितीत परवाना मिळवून शेतीमाल खरेदी करू शकतो. मात्र, येथील स्थानिक व्यापाऱ्यांना ही खुली स्पर्धा न ठेवता शेतीमालाचे भाव व लिलावाची मक्तेदारी आपल्या हातात ठेवण्यासाठी असोसिएशनच्या सभासदत्वाचे कारण पुढे करतात. लिलाव करण्याचा परवाना बाजार समिती देते, मग त्यात असोसिएशनचे सभासदत्व असल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मात्र, नवीन व्यापाऱ्यांना रोखण्यासाठी लासलगावमध्ये हा प्रकार सुरू आहे.

नाफेडच्या खरेदीमुळे भाववाढीचीही पोटदुखी
अनेक वर्षांपासून नाफेड विविध संस्थांमार्फत कांदा खरेदी करीत आहे. ज्या ज्या वेळी ती सुरू होते.त्यावेळी कांद्याच्या दरात भाववाढ झाल्याचे अनेकदा पहायला मिळते. अशा परिस्थितीत नाफेड गुरुवारी कांदा खरेदीला उतरल्यावर आपल्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल या प्रतीक्षेत शेतकरी असतानाच केवळ सभासदत्व नाही या कारणाने महिला संस्था कांदा लिलावात सहभागी झाल्याने व्यापाऱ्यांनी काढता पाय घेतल्याने शेतकऱ्यांचे कांदा लिलाव ठप्प झाल्याने त्यांना माघारी परतावे लागले व त्यांचे नुकसानच झाले.

खरेदीचा परवाना, मग स्थानिक सभासदत्वाला आधार काय?
एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून विविध योजना आखल्या जातात. त्यातच राज्य सरकारने शिवार खरेदीची परवानगी दिलेली असल्याने कुठलाही व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीमाल खरेदी करू शकतो. कृषीसाधना संस्थेलाही लासलगाव बाजार समितीतर्फे कांदा खरेदीचा परवाना देण्यात आला आहे, मग अशाप्रकारे स्थानिक असोसिएशनच्या सदस्यत्वाच्या कारणाला कायदेशीर आधार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आमच्या संस्थेकडे खरेदीचा परवाना आहे, आम्ही विंचूरमध्ये खरेदी करीत आहोत, मग येथेच मनाई का?
नाफेडसारख्या राष्ट्रीय संस्थेने ग्रामीण भागातील छोट्या संस्थेला कांदा खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे. आम्ही लिलाव प्रक्रियेत सहभागी होतो त्यावेळी निश्चितच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. आम्ही पहिल्यांदाच कांदा खरेदी करीत असताना विंचूर येथे लिलावात सहभागी होण्यासाठी परवानगी मिळते. मात्र लासलगाव येथील स्थानिक व्यापारी आम्ही असोसिएशनचे आम्ही सभासद नाही, या कारणाने लिलाव साेडून निघून जातात. हे कोणत्या कायद्यात बसते? महिलांच्या संस्थेला अशाप्रकारे पुरुष व्यापाऱ्यांकडून विरोध होत असेल, तर ते निश्चितच वेदनादायी व राज्य आणि लासलगाव बाजार समितीला शोभणारे नाही. - साधना जाधव, संचालिका, कृषीसाधना

नाफेडचे पत्र आणावे
नाफेडसाठी कृषीसाधना ही संस्था कांदा खरेदी करीत असल्याचे आम्हाला तोंडी सांगण्यात आले. त्यांनी लेेखी पत्र आणावे, तेव्हा आम्ही त्यांना लिलावात सहभागी होण्याची संधी देेऊ. - सुवर्णा जगताप, अध्यक्ष, लासलगाव बाजार समिती

व्यापाऱ्यांची मनमानी म्हणून बदनामी नकाे
नाफेडने कांदा खरेदीची परवानगी नेमकी कुणाला दिली, याचा लेखी पुरावा हवा. स्थानिक असोसिएशन सगळ्या बाजार समित्यांमध्ये आहे. लासलगावच्या व्यापाऱ्यांची मनमानी म्हणून बदनाम करू नये. - नंदकुमार डागा, अध्यक्ष, लासलगाव व्यापारी असोसिएशन

बातम्या आणखी आहेत...