आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य बाल, संस्कृत आणि मराठी नाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि काही चांगल्या नाटकांचा रसिकांना हवासा असलेला वसंत पोतदार नाट्य महोत्सव शनिवारी (दि. १३) उत्साहात सुरू झाला. पहिल्या दिवशीच्या ‘तुला इंग्रजी येतं का?’ या बालनाट्याला आणि ‘मृगयाकलह:’ या संस्कृत नाटकाला रसिकांनी दाद दिली.
स्व. वसंत पोतदार यांच्या स्मृती जागविण्यासाठी राजा पाटेकर आणि मित्रमंडळींतर्फे चार दिवसांचा नाट्य महोत्सव भरविण्यात येतो. त्यानुसार शनिवारी दिग्दर्शक रोहित जाधव, तन्मय भोळे या तरुण रंगकर्मींच्या हस्तेच वसंत पोतदार यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि पाटेकर यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाटेकर यांनी पोतदार यांच्या आठवणी जागविल्या. विनोद राठोड यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर नाट्यसेवा थिएटरच्या कलाकारांनी स्वप्नील पाटील लिखित, रोहित जाधव दिग्दर्शित ‘तुला इंग्रजी येतं का?’ हे बालनाट्य सादर झाले. उनाड मुलाला काहीच येत नसतं. मात्र त्याच्याच नावाचा दुसरा मुलगा राज्यात प्रथम येतो. उनाड मुलाचा मात्र सत्कार होत असतो. त्याचा खोटेपणा उघड होतो आणि त्यानंतर तो मन लावून अभ्यास करून त्याला इंग्रजी येऊ लागतं असा या नाटकाचा आशय होता. यात हर्षदीप अहिरराव, सौ रभ क्षीरसागर, तनिश वाघमारे, प्रचिती अहिरराव, तनिष्का अहिरराव, आर्या कोतकर, श्रेया जंगम, आशू चव्हाण, सुयश लोथे, समर्थ लोखंडे, देव खर्डे यांच्या भूमिका होत्या.
त्यानंतर तन्मय भोळे लिखित, दिग्दर्शित ‘मृगयाकलह:’ हे संस्कृत नाटक सादर झाले. अर्जुनाचा भगवान शंकराकडून पाशुपतास्त्र विद्या प्राप्त करण्यासाठीचा प्रवास म्हणजे हे नाटक. महाकवी भारवी यांच्या ‘किरातार्जुनीयम्’ या महाकाव्यातील काही भागांचे हे नाट्य रूपांतरण आहे. यात निखिल जगताप, संत सागर, तन्मय भोळे, अनिकेत इनामदार, गौरव चव्हाण, हेरंब कुलकर्णी यांच्या भूमिका होत्या. तर अबोली गटणे यांचे संगीत, चैतन्य गायधनी यांचे नेपथ्य आणि प्रकाशयोजना होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.