आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई-आग्रा महामार्गावरील पाडळी देशमुख येथील गोदामाजवळ सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास नाशकातील एका महिलेच्या मानगुटीवर बिबट्याने हल्ला चढवला. या वेळी सोबत असलेल्या मैत्रिणीने बिबट्यावर दगड व मातीचा मारा केल्याने त्याने धूम ठोकली. जखमी महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नाशिक येथील सुरेखा अशोक विभुते (३०) व शांताबाई शिवाजी रेपूकर (४०, दोघीही रा. म्हाडा घरकुल, मुंबई नाका, नाशिक) या पहाटे भंगार गोळा करण्यासाठी पाडळी शिवारात गेल्या होत्या. पुलाखालील प्लास्टिक घेण्यासाठी सुरेखा गेल्या असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. सोबत असलेल्या शांताबाई यांनी बिबट्याचा प्रतिकार करत मैत्रिणीचा जीव वाचवला. वर्दळीच्या महामार्गावर बिबट्याचा महिलेवर हल्ला झाल्याने पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज धामच्या रुग्णवाहिकेचे निवृत्ती गुंड यांना या घटनेबाबत समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी महिलेला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
गेल्या वर्षी तिघांचा बळी
गेल्या वर्षी तीन जण बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले होते. तालुक्यातील काळुस्ते ग्रामपंचायत हद्दीतील दरेवाडी येथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याने तो ठार झाला होता. फोडशेवाडी येथे सहा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला हाेता. मात्र, त्याच्या आईने प्रसंगावधान राखत मुलाला वाचवले हाेते. खैरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात ८० वर्षाची वृद्ध महिला ठार झाली आहे. खेड येथेही १४ वर्षीय मुलगी ठार झाली आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे.
शांताबाईच्या धाडसाने आला जिवात जीव!
काही वर्षांपासून शहरातील गोंविदनगर येथील एका खासगी रुग्णालयात काम करत होते. पण, दोन दिवसांपूर्वीच ते काम सोडल्याने आणि घरखर्चाला पैसे नसल्याने शेजारी शांताबाई शेपूकर (५५) यांच्यासोबत पहाटे साडेपाच वाजता उठून भंगार गोळा करण्यासाठी घरातून निघाले होते. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शहरातील भारतनगरमधील घरकुल इमारतीत राहणाऱ्या सुरेखा अशोक विभुते (३०) ‘दिव्य मराठी’शी बोलत होत्या. साडेसहा वाजेच्या दरम्यान पाडळी देशमुख येथील एका गोदामाजवळ पाेहोचलो. भंगार गोळा करण्यास सुरुवात केली असता मागे दबून बसलेल्या बिबट्याने मागून माझ्यावर हल्ला केला. . त्याने माझ्या मानगुटीलाच पकडले होते. परंतु, शांताबाई यांनी जराही न डगमगता जवळ असलेली दगडमाती उचलून बिबट्यावर फेकणे सुरू केले. त्यामुळे बिबट्याही गांगरुन गेला व त्याने धूम ठोकली. सुटलो बुवा असे म्हणत जरा सावरत असताना बिबट्याने पुन्हा एकदा अचानक मागून माझ्यावर हल्ला करत माझा पाय धरला. शांताबाई यांनी परत दगडमाती फेकल्याने बिबट्या पळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.