आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरवस्तीत बिबट्याचे दर्शन:नाशिकमध्ये सिटी सेंटर मॉल परिसर, सातपूर भागात वावर; वनविभागाकडून शोधमोहीम सुरु

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रातिनिधीक फोटो. - Divya Marathi
प्रातिनिधीक फोटो.

सातपूर औद्योगिक वसाहतीत नीलकमल मार्बल कंपनीच्या मागे असलेल्या रहिवासी भागात आज बिबट्या आढळून आला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला आहे. तसेच, गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिटी सेंटर मॉल परिसरात मध्यरात्री बिबट्या दिसत आहे. वनविभागाच्या पथकाने गुरुवारी दिवसभर परिसरात बिबट्याचा शोध घेतला. मात्र, बिबट्या सापडला नाही. त्यामुळे येथील व्यापारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बिबट्या आला कुठून?

आज सातपूर औद्योगिक वसाहतीत बिबट्या दिसताच रहिवाशांनी वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी बिबट्याचा शोध घेत आहे. मात्र, तो सापडत नसल्याने नागरिक दहशतीत आहेत. यापूर्वीदेखील अनेकदा नाशिक शहर व परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. तेव्हा प्रशासनाने जंगली प्राणी शहरात येऊ नये म्हणून काही उपाययोजना केल्या होत्या. अशात आता शहरात आलेला बिबट्या नेमका कुठून आला, याचा शोध वनविभाग घेत आहे.

रात्री घराबाहेर न पडण्याचे आवाहन

शहराचा मध्यवर्ती भाग आणि नेहमी वर्दळ असणाऱ्या सिटी सेंटर मॉल परिसरातील उषाकिरण सोसायटी, एबीबी सर्कल या भागात मध्यरात्री बिबट्या आढळून आला. त्यामुळे गुरुवारी दिवसभर वनविभागाच्या पथकाने एबीबी सर्कल, सिटी सेंटर मॉल या परिसरातील झाडांमध्ये बिबट्याचा शोध घेतला. तसेच, परिसरातील रहिवाशांनादेखील रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या. अशातच आज हा बिबट्या या परिसराला लागूनच असलेल्या सातपूर औद्योगिक वसाहतीत आढळून आला आहे. त्यामुळे वन विभागाने आता या भागात बिबट्याच्या शोधासाठी मोर्चा वळवला आहे.

बातम्या आणखी आहेत...