आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत:कुत्र्यांच्या भुंकण्याने दुचाकीचा वेग केला कमी; समोर मात्र बिबट्या

नाशिक2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीसीटीव्हीत बिबट्या कैद; अश्विन नगरला बिबट्या असल्याची अफवा

मध्यरात्री कुत्रे प्रचंड भुंकत हाेते. त्याला वाटलं की, शुकशुकाट अाहे, रस्त्यावर गाड्या बघून कुत्रे नेहमीच भुंकतात, कुत्र्यांना बघून त्याने त्याच्या दुचाकीचा वेग मंदावला, मात्र थाेडा पुढे जाताच कुत्रा नाही तर त्याच्या गाडीसमाेर उभा राहिला बिबट्या. त्याची पाचावर धारण बसली. कसाबसा ताे तिथून पुढे अाला पण, गाडीवरील नियंत्रण सुटले, पडला अन‌् जखमी झाला. ताेपर्यंत बिबट्या मात्र पसार झाला.

सिडकाेच्या सिंहस्थनगरमधील मंगळवारी (दि. ४) मध्यरात्रीची ही घटना. शुभम गायकवाड हा युवक मंगळवारी मध्यरात्री साडेबारा-एक वाजेदरम्यान सिंहस्थनगर येथील परदेशी चौकातून सेंट लॉरेन्स शाळेसमोरून घराकडे जात होता. यावेळी त्याला कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. पुढे जाताच त्याच्यासमाेर बिबट्या अाला. त्याने दुचाकीचा वेग वाढविला. मात्र त्यामुळे बिबट्याही जोरात पळाला. बिबट्या अंगावर उडी घेतो की काय? हल्ला करतो की काय? या भीतीने घाबरलेल्या शुभमचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो खाली कोसळून जखमी झाला. त्याने सामाजिक कार्यकर्ते अक्षय परदेशी यांना फोन केला. त्यांनी घटनास्थळी पोहाेचत अंबड पोलिस व वनविभागाला माहिती कळविली. रात्रीच या ठिकाणी पथकाने माहिती घेतली. हाच बिबट्या सिंहस्थनगर येथे एका कुटुंबियांनाही दिसला. त्यानंतर तो वासननगर, पाथर्डी फाट्याकडून पांडवलेणीकडे निघून गेल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जीवानिशी वाचलो हेच महत्त्वाचे
बिबट्याला मी अाणि त्यानेही मला पाहिले. ते अाठवून अजूनही अंगावर काटा येतो. मी दुचाकी पुढे नेली नसती अाणि कदाचित दुचाकीवरून पडलो नसतो तर बिबट्याने नक्कीच माझ्यावर हल्ला केला असता. - शुभम गायकवाड, जखमी युवक

बिबट्या रात्री एक वाजेच्या सुमारास सिंहस्थनगर येथे होता. त्यानंतर तो पाथर्डी फाट्याकडून पुढे पांडवलेणीकडे निघून गेला. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. - विवेक भदाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी

बिबट्या सीसीटीव्हीत कैद
या घटनेतील बिबट्या दोन ठिकाणी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. एका शाळेतील गेटमधून उडी मारून पळणारा बिबट्याचे हे दृश्य थरकाप उडविणारे आहे. हीच घटना दिवसा घडली असती तर प्रचंड गाेंधळ उडाला असता. तरी या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अाहे. काही दिवसांपूर्वी बिबट्या अंबड पोलिस स्टेशन परिसरातही दिसला हाेता. अात येऊन तो पुन्हा गेटमधून बाहेर जाताना सीसीटीव्हीत कैद झाला होता.

बातम्या आणखी आहेत...