आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन शैक्षणिक वर्षाला सोमवार (दि. १३) पासून प्रारंभ झाला आहे. उद्यापासून (दि. १५) विद्यार्थी शाळेत येणार आहेत. कोविडचा संसर्ग कमी झाल्याने दोन वर्षानंतर यंदा शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार असल्याने विद्यार्थी-पालकांसह शिक्षकांमध्ये उत्साह आहे. मात्र दुसरीकडे इयत्ता पहिली ते आठवीच्या इंग्रजी माध्यमासह मराठी, हिंदी व इतर माध्यमाच्या अनेक पाठ्यपुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला असून येत्या दोन-तीन दिवसात पुस्तके उपलब्ध होतील असे बालभारतीकडून सांगण्यात आले. पुस्तके मिळत नसल्याने विद्यार्थी तसेच पुस्तक विक्रेते हैराण झाले आहेत.
राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत वितरणासाठी पुस्तकांची छपाई केली जाते.
शहरातील अनेक विक्रेत्यांकडे पाठ्यपुस्तकेच उपलब्ध नाही
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह इतर ठिकाणच्याही विक्रेत्यांकडे विक्रीसाठी पुस्तके उपलब्ध नाहीत. शालिमार, कॉलेजरोड, सिडको, सातपूर, नाशिकरोड अशा विविध ठिकाणच्या पुस्तकविक्रेत्यांकडे अनेक विषयांच्या पुस्तकांचा तुटवडा आहे.
या पुस्तकांचा तुटवडा
बालभारतीने छपाई केलेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या इंग्रजी माध्यमासह मराठी, हिंदी व इतर माध्यमाच्या अनेक पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात माय इंग्लिश बुक (१५ हजार मागणी), इयत्ता पहिलीचे इंग्रजी व गणित (२० हजार), इयत्ता दुसरीचे इंग्रजीचे पुस्तक (२० हजार), इयत्ता चाैथीचे सुलभ भारती (१५ हजार) यांसह सहावी, सातवी, आठवीमधील काही विषयांच्या पुस्तकांचा तुटवडा असून त्याची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदविण्यात आल्याची माहिती नाशिक येथील बालभारतीच्या भांडार विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. येत्या दोन-तीन दिवसांत ही पुस्तके उपलब्ध होतील, असे
त्यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले.
पुस्तके तत्काळ उपलब्ध करून द्यावीत
शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी व पालक पुस्तके घेण्यासाठी येत आहे. मात्र, आमच्याकडे पुस्तके उपलब्ध नाही. बालभारतीकडे वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांबरोबरच विक्रेतेही हैराण झाले आहे.
- अतुल पवार, अध्यक्ष, नाशिक जिल्हा बुक सेलर असोसिएशन
पुस्तके लवकर उपलब्ध करावी
दोन वर्षे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत होतो. या वर्षापासून शाळा सुरू होत आहे, मात्र पुस्तके उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर पुस्तके उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
- दत्तात्रय मोरे, पालक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.