आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन:सिडकाे कार्यालयाचा याेग्य ताे निर्णय घेऊ : मुख्यमंत्री

सिडकोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोने लिज होल्डने दिलेली घरे फ्री होल्ड करून रहिवाशांना संपूर्ण मालकी मिळेपर्यंत सिडको प्रशासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रविवारी (दि. ६) भेटून केली आहे. दरम्यान, नागरिकांचे नुकसान हाेणार नाही, या दृष्टीने याेग्य ताे निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

नाशिकमधील सिडकाेचे प्रशासकीय कार्यालय बंद करण्याचा शासनाने निर्णय घेऊन तातडीने परिपत्रक काढले. याबाबत माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही विराेध दर्शवित आंदाेलनाची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी (दि.६) मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. यासंदर्भात, सिडको प्रशासकीय कार्यालय लवकरच पूर्ववत सुरू होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे तिदमे यांनी सांगितले.बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख तिदमे यांनी दिलेल्या निवेदनात, सिडकोने सदनिका धारकांना ९९ वर्षे कराराने २५,००० घरे विकली असून अंदाजे ५,००० वेगवेगळ्या वापरांचे भूखंड वाटप केलेले आहेत.

वेगवेगळ्या ठिकाणी अंदाजे १५०० टपरी भूखंडे देखील वाटप केलेली आहेत. सिडकोने ‘लिज होल्डने’ दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ करून घरधारकांना संपूर्ण मालकी द्यावी, अल्प उत्पन्न गटातील घरधारकांना कर्ज काढावे लागते. मात्र, लिज होल्डला अनेक बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे फ्री होल्डची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कार्यालयाचे कामकाज बंद करू नये, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संजय माशेलकर, जयंत साठे, संजय बच्छाव, अनिल ढिकले, लक्ष्मी ताठे, अस्मिता देशमाने, योगेश म्हस्के, सदानंद नवले, अॅड. श्रद्धा जोशी आदी उपस्थित हाेते.

छगन भुजबळ यांचेही मुख्यमंत्र्यांना पत्र
सिडकोचे नाशिक येथील कार्यालय औरंगाबाद येथे गेल्याने नाशिकच्या सिडको वसाहतीतील नागरिकांना कागदपत्रांच्या कामकाजासाठी नाहक औरंगाबादला फेऱ्या माराव्या लागतील. त्यामुळे सिडकोवासीयांसाठी असलेला हा अन्यायकारक निर्णय तत्काळ मागे घेऊन नाशिक येथील सिडकोचे कार्यालय पूर्ववत सुरू ठेवा,अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

बातम्या आणखी आहेत...