आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन टॅपिंग प्रकरण:फडणवीसांना 5 वेळा पत्र, ठाण्यातही बोलावले, पोलिस बदल्या फोन टॅपिंगप्रकरणी मुंबई पोलिसांची नोटीस

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधातील फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई सायबर पोलिस, माजी मुख्यमंत्री व भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवणार आहेत. यासाठी रविवारी ११ वाजता बीकेसी येथील सायबर पोलिस कार्यालयात हजर राहण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी फडणवीसांना पाठवली होती. मात्र, त्याचा फडणवीसांना लाभ होईल याचा अंदाज आल्यावर पोलिसांनी स्वत:च त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील मंत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिस दलात बदलीसाठी आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती देणारे गोपनीय पत्र पोलिस महासंचालकांना पाठवले होते. ते पत्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांच्या बीकेसी येथील सायबर पोलिस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ अॅक्ट कलम-४३ ब व माहिती तंत्रज्ञान अधिनियम-२००८, ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट-१९२३ या कलमांखाली दाखल गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

या प्रकरणी माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांनी फौजदारी दंड संहिता कलम-१६० अन्वये नोटीस बजावली होती. फडणवीस यांना यापूर्वी या प्रकरणात अनुक्रमे २१ ऑगस्ट, ६ सप्टेंबर, ८ ऑक्टोबर, १७ नोव्हेंबर आणि २ मार्च अशी पाच पत्रे पाठवून पोलिसांनी माहिती मागवली होती. ही माहिती लेखी देणार असल्याचे पत्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून ९ सप्टेंबरला पोलिसांना पाठवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ती माहिती न आल्याने या गुन्ह्याचे तपास अधिकारी सायबर विभागाचे नितीन जाधव यांनी फडणवीसांना रविवारी ११ वाजता बीकेसी पोलिस ठाण्यात जवाब देण्याची नोटीस दिली.

फडणवीसांची पत्रपरिषद अन् पोलिसांना धडकी
महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या गैरव्यवहारांचा गौप्यस्फोट करत असल्याने मुंबई पोलिसांनी ही नोटीस पाठवल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. सोबतच पुणे दौरा रद्द करून रविवारी पोलिसांच्या चौकशीस जाणार असल्याचेही नमूद केले. तसे झाले तर फडणवीसांना त्याचा राजकीय लाभ घेता आला असता या विचाराने पोलिस सावध झाले आणि जबाब नोंदवण्यासाठी घरी येणार असल्याचे कळवले.

बातम्या आणखी आहेत...