आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये दिव्यांग कायद्याचे सर्रास उल्लंघन:अपंगांच्या निधीतून 50 लाख रुपये खर्चून बसविलेल्या लिफ्टचा अधिकाऱ्यांसाठीच वापर

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत समाज कल्याण विभागाने अपंगांसाठीच्या राखीव निधी याेजनेतून 50 लाख रुपये खर्चून लिफ्ट बसवली आहे. मात्र, या लिफ्टचा वापर दिव्यांग बांधवांना करता येणार नाही, असे प्रयत्न बांधकाम विभागाकडून सुरू आहेत.

तळ मजल्यावरील लिफ्ट आता थेट सभागृह असलेल्या तिसऱ्या मजल्यावरच थांबते व तेथून तळ मजल्यावर येते. बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या या बदलामुले दिव्यांगांसाठी असलेली लिफ्ट त्यांनाच वापरता येत नसल्याने दिव्यांग हक्क व कायद्या 2016 चे उल्लंघन हाेत आहे.

अडचणींचा सामना

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या इमारतीत महिला व बालकल्याण, लघु पाटबंधारे, पाणी पुरवठा विभाग व माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयांसह तिसऱ्या मजल्यावर सभागृह आहे. या कार्यालयांमध्ये शासकीय कामांसह विविध याेजनांसाठी नागरीकांसह दिव्यांग बांधवांची ये - जा सुरुच असते. मात्र पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात जाण्यासाठी दिव्यांगांना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागत हाेता.

नागरिकांचा सवाल

अपंग संघटनांसह तत्कालीन लाेकप्रतिनिधींनी वेळाेवेळी केलेल्या मागणीमुळे 2018 मध्ये नवीन इमारतीसाठी लिफ्ट मंजुर करण्यात आली. वर्षभराने लिफ्टचे काम झाल्यानंतरही अनेक महिने उद्घाटन न झाल्यामुळे लिफ्ट बंदच हाेती. फक्त जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी लिफ्ट सुरू ठेवली जात हाेती. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या हक्काच्या निधीतून बसविलेली लिफ्ट नेमकी कुणासाठी? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

लिफ्टचा वापर व्हावा

आमदार बच्चु कडू यांनी तत्कालीन सीईओ दीपककुमार मिना यांना सांगून अपंगांच्या निधीतून लिफ्ट उभारण्यास सांगितले हाेते. मात्र लिफ्टचा वापर अपंगांऐवची दुसऱ्याच सुदृढ व्यक्तींकडून हाेत आहे. हे चुकीचे असून प्रशासनाला याबाबतचा जाब विचारला जाईल.

- दत्तु बाेडके, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, प्रहार संघटना

दिव्यांग हक्क व कायद्याचे उल्लंघन

केंद्र सरकारच्या सुगम्य भारत अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्तींना अडथळा विरहीत सुलभ रित्या सार्वजनिक ठिकाणी प्रवास करता यावा यासाठी लिफ्ट, रॅम्प, रॅलींग असणे बंधनकारक आहे. मात्र अपंगांच्या राखीव निधीतून उभारलेल्या लिफ्टचा दिव्यांग बांधवांना फायदा हाेत नाही. हे एक प्रकारे दिव्यांग हक्क व कायद्याचे उल्लंघन आहे.

- बबलू मिर्झा, पदाधिकारी दिव्यांग प्रहार संघटना

लिफ्टच्या थांब्याजवळच भगदाड

नवीन इमारतीत बसविण्यात आलेल्या लिफ्टच्या आजुबाजुचा परिसर पेव्हर ब्लाॅकने सुशाेभित करण्यात आला हाेता. मात्र सद्य स्थितीत लिफ्टजवळील पेव्हर ब्लाॅक उ‌खडल्याने तेथे भगदाड पडले आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची भिती कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...