आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात १५ नाेव्हेंबरपासून राज्य नाट्य स्पर्धा सुरू हाेत आहे. या स्पर्धेत यंदा २९ नाटके सादर हाेणार आहेत. त्यामुळे एकीकडे आनंद व्यक्त हाेत असतानाच स्थानिक नाटकांना नाशिकमध्येच बाहेरच्या नाटकांशी स्पर्धा करावी लागणार असल्याची रंगकर्मींमध्ये चर्चा आहे. यातीलच एखादे नाटक पुढे गेले तर ताे फटका नाशिकच्या स्थानिक संस्थांच्याच नाटकांना बसणार असल्याचे रंगकर्मी बाेलू लागले आहेत.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून राज्यभरात सुरू होत हाेत असल्याची घाेषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी (दि. ९) करत तसे वेळापत्रकही सांस्कृतिक खात्याकडून जाहीर करण्यात आले. नाशिकच्या प. सा. नाट्यगृहात रोज सायंकाळी ७ वाजता नाशिक विभागाची प्राथमिक फेरी रंगणार आहे. यंदा या स्पर्धेत नाशिक शहरासह येवला, सिन्नर, इंदाैर आणि धुळे येथील तब्बल २९ संघांनी सहभाग घेतल्याने स्पर्धा चुरशीची होऊ शकते. २० नाटके स्पर्धेत असल्यास दोन नाटके अंतिम स्पर्धेसाठी पुढे जातात तर आता २९ नाटके प्राथमिक स्पर्धेत असल्याने एकूण तीन नाटकांची निवड अंतिम स्पर्धेसाठी केली जाणार आहे. १४ डिसेंबरला शेवटचे नाटक सादर होणार आहे.
..तर नाशिकच्या स्थानिक नाटकाला फटकाच
गेल्यावेळी नाशिकची दाेन दमदार नाटके अंतिम फेरीत गेली हाेती. आता २९ नाटके सादर हाेणार असल्याने तीन नाटके अंतिम फेरीसाठी जाणार आहेत. ती तीनही नाटके नाशिकच्या स्थानिक संस्थांचीच असावी असा सूर नाशिकच्या रंगकर्मींमध्ये उमटत आहे. मात्र धुळ्याची २ नाटके आणि इंदाैरचेही एक नाटक नाशिक केंद्रात हाेणार असल्याने आणि त्यातील एक नाटक अंतिमसाठी पुढे केल्याने नाशिकच्या एका नाटकाला त्याचा फटकाच बसणार असल्याने रंगकर्मींनी शासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
नाशकातून धुळ्याचे नाटक हाेते अंतिमला
तीन-चार वर्षांपूर्वी नाशिक केंद्रावर सादर झालेले धुळ्याचे ‘छूमंतर’ हे नाटक केंद्रात दुसरे आल्याने त्याची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली हाेती. बाहेरचे नाटक नाशिकच्या केंद्रात सादर झाल्याने रंगकर्मींनी नाराजी व्यक्त केली हाेती. हेच नाटक जळगावला सादर झाले असते तर नाशिकच्या नाटकाला संधी मिळाली असती, असा सूर त्यावेळीही उमटला हाेता.
थेट बाेलण्यास भीती
शासनाची स्पर्धा असल्याने आपण यासंदर्भात काही बाेललाे तर त्याचा परिणाम आपल्याच नाटकावर हाेईल या भीतीने सहभागी संस्थांचे प्रतिनिधी थेट बाेलत नसल्याचे चित्र आहे.
वेळापत्रक जाहीर झाल्यावर इंदाैरच्या नाटकाची भर
सांस्कृतिक खात्याने बुधवारी राज्य नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले हाेते. त्यात २६ नाेव्हेंबरला काेणतेही नाटक दिसत नाही. मात्र गुरुवारी (दि. १०) शासनादेशानुसार नाशिक केंद्रावर इदाैरच्या नाट्यभारती संस्थेचे ‘खिडक्या’ हे नाटक सादर हाेणार आहे. इंदाैरला खरंतर नागपूर किंवा विदर्भातील काेणतेही केंद्र अधिक जवळ आहे. फार फार तर जळगाव देखील चालू शकते, मात्र तरीही इंदाैरचे नाटक नाशिकला का जाेडले असा प्रश्न रंगकर्मी उपस्थित करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.