आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शहरासह जिल्हाभरात गेल्या महिन्यापासून वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे अखेर प्रशासनाने कोरोना प्रतिबंधाचे निर्बंध कडक करत त्यामध्ये वाढ केली आहे. जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, मेडिकल वगळता इतर बाबी या सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी दिली असून, हे सर्व निर्बंध मंगळवारी (दि. ९) मध्यरात्री १२ वाजेपासून लागू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी (दि. ८) जाहीर केले. वृत्तपत्रांवर कुठलेही निर्बंध लादले नसून त्यांचे नियमित वितरणही सुरू राहणार आहे.
ठाणे शहरातील 16 हॉटस्पॉट भागात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन
ठाणे शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाला रोखण्यासाठी 16 हॉटस्पॉट भागामध्ये येत्या 31 मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाऊन असेल. अशी माहिती ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.
नाशिक : अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत चारपट वाढ
एकाच महिन्यात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत चारपट वाढ झाली आहे. नागरिकांना सातत्याने आवाहन करूनदेखील नियमांचे पालन होताना दिसत नाही. तसेच बाजारपेठांमधील गर्दीदेखील कमी होत नसल्याने अन् वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सोमवारी (दि. ८) सायंकाळी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. त्यात निष्ठूर न होता निर्बंध कडक करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. बार, परमिट रूम, हॉटेल्स, मद्य दुकानांची वेळ एक तासाने कमी करत ते १० ऐवजी आता रात्री ९ पर्यंत सुरू राहतील.
नाशिक शहरातील शाळा या मनपा आयुक्तांनी यापूर्वीच बंद केल्या असून मालेगाव, नाशिक, निफाड आणि नांदगाव या चार तालुक्यांत कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याने येथील शाळा-महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत अनिश्चित काळासाठी बंद राहतील.दहावी व बारावीचे वर्ग हे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक राहणार असून, महाविद्यालयांनाही वर्ग ऑनलाइनच सुरू ठेवण्याचा मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ही चार तालुके वगळता इतर तालुक्यांतील शाळा मात्र सुरू राहतील.
हे आहेत निर्णय
- जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर बाबींना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतच परवानगी
- नाशिक, नांदगाव, मालेगाव, निफाडमधील शाळा पूर्णपणे बंद.
- दहावी-बारावी शाळा पालकांच्या संमतीनुसार सुरू राहतील. ऑनलाइन सुरू ठेवल्यास उत्तम.
- जिम, मैदाने, स्वीमिंग टँक केवळ व्यक्तिगत वापरासाठी, सरावापुरतेच राहणार सुरू. स्पर्धा, गर्दीवर बंदी.
- हॉटेल, परमिट रूम, बार सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत निम्म्या कर्मचारी क्षमतेने राहतील सुरू.
- पार्सल सेवा रात्री १० पर्यंत.
- १५ मार्चनंतर लग्न सोहळ्यांना बंदी.
- धार्मिक सोहळे, सामाजिक समारंभ, राजकीय सभांवर बंदी.
- एमपीएससी आणि यूपीएससीच्या तसेच प्रस्तावित परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार.
- जिल्ह्यात नाशिक आणि मालेगावमध्ये खासगी क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद.
- शनिवार, रविवार धार्मिकस्थळे राहणार बंद. इतर दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत खुली.
- सर्व आठवडे बाजार बंद
- बाजार समित्या ५० टक्के क्षमतेने
- आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.